Uddhav Thackeray Resignation : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सराकर अल्पमतात आलं होतं. त्यामध्येच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिद्ध करा, असे निर्देश काढले. त्याविरोधात महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवानात दाखल होणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. फटाके वाजवून आणि पेढे वाटून भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार, अशा प्रकारचे ट्वीटसही येऊ लागले आहेत. राजभवनावर जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाल्याचं समजतेय. कदाचीत गुरुवारी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात.
उद्या महाराष्ट्राचा जनतेची "उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकार पासून मुक्तता होणार, असे ट्वीट भाजप नेते सोमय्या यांनी केले आहे. बहुमत गमावल्याची खात्री पटल्यानंतर देखील सत्तेच्या मोहापायी सर्वोच्च न्यायालयात गेलेले महाविकास आघाडी सरकार अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडले. वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असता तर थोडी तरी अब्रू वाचली असती, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केलेय. तर मी पुन्हा येईन ..... नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! असे ट्वीट महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलेय.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला. नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं केलं, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केलं, यामुळे आयुष्य सार्थक लागलं. एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते. आज मला शरद पवार आणि सोनिया गांधींचे आभार मानायचं आहे. आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ चारच मंत्री होते, याचं जरा दु:ख होतंय. साधी माणसं, कुणी रिक्षावाले, कुणी टपरीवाले तर कुणी हातभट्टीवाले... या सर्वांना शिवसेनाप्रमुखांनी माणसात आणलं, आमदार, खासदार बनवलं, मंत्री बनवलं. पण हे लोक मोठी झाल्यानंतर नाराज झाले. ज्यांना सर्वकाही दिलं ते नाराज झाले...पण ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत.
लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार
उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे त्याचं पालन करणं आवश्यक आहे. लोकशाहीचे पालन झालंच पाहिजे, मी राज्यपालांचे आभार मानतो, केवळ एका पत्रानंतर लगेच त्यांनी हालचाल केली आणि बहुमत सिद्ध करायला सांगितलं. जे लोक दगा देणार असं सांगितलं गेलं, त्यांनी साथ दिली. आपली नाराजी होती तर सुरतमध्ये किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन सांगायला हवं होतं.