नागपूर : भाजपचे दयाशंकर तिवारी नागपूरचे नवे महापौर असणार आहे. आज महापौर आणि उपमहापौर पदही निवडणूक होऊन दयाशंकर तिवारी मोठ्या मताधिक्याने महापौरपदी निवडून आले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत तिवारी यांनी काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा पराभव केला. भाजपचे दयाशंकर तिवारी यांना 107 मतं मिळाली. तर महाविकास आघाडी कडून काँग्रेस उमेदवारचे रमेश पुणेकर यांना 27 मतं मिळाली आहे. बहुजन समाज पक्षाच्या नरेंद्र वालदे यांना 10 मतांवर समाधान मानावे लागले. तर पाच नगरसेवक अनुपस्थित राहिले. दयाशंकर तिवारी नागपूरचे 54 वे महापौर ठरले असून महापालिकेच्या इतिहासात आज प्रथमच ऑनलाइन पद्धतीने महापौरपदाची निवडणूक झाली. सर्व नगरसेवक मोबाईल आणि लपटॉपवरून या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते.


उपमहापौरपदी भाजपच्या मनीषा धावडे यांची निवड झाली. राज्य शासनाने कट रचून ऑनलाइन पद्धतीने निवडणूक घ्यायला लावत निवड प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ बनवल्याचा आरोप यावेळी दयाशंकर तिवारी यांनी केला. दरम्यान या एकतर्फी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं गटबाजी खास चर्चेचा मुद्दा ठरली. महापौर पदासाठी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांनी परस्पर दोन उमेदवार दिले होते. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या गटातून मनोज गावंडे यांना तर आमदार आणि शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटातून रमेश पुणेकर यांना महापौर पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. पराभव निश्चित दिसताना ही नागपूर काँग्रेसमधील ही गटबाजी काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत ही पोहोचली होती. अखेर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना हस्तक्षेप करत वनवे गटाला माघार घ्यायला सांगावे लागले. त्यानंतर काँग्रेसच्या मनोज गावंडे यांनी आज सकाळी माघार घेतली. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची एकसंघता कायम ठेवणे शक्य झाले.


नवी मुंबईत भाजपला धक्का;नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांचा NCPमध्ये प्रवेश