अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू हे हजारो शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीतील किसान मोर्चाला समर्थन देण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनाने मोर्चा घेऊन निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आधी राज्यातील शेतकऱ्यांवर लक्ष द्यावे, अशी टीका भाजपने केली आहे. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून गुरुकुंज मोझरीमध्ये आज भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. उद्या भाजप हे बच्चू कडू यांच्या बेलोरा गावात आंदोलन करणार आहेत.


राज्यमंत्री बच्चू कडू हे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकवीत असून महाराष्ट्र सरकाराने सत्तेत आल्यापासून कायम शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहे. 25 हेक्टर मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार होती. परंतु, मदत मिळाली नाही, दूध दरभाव वाढ देण्यात आली नाही. पावसामुळे विदर्भाचे प्रचंड नुकसान झाले असताना तुटपुंजी मदत देण्यात आली. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू हे नौटंकी आंदोलन भूमिका घेत असल्याचं भाजपने म्हटले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करन्यात आली.


दहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचं आंदोलन :
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आज दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नवे कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचं समर्थन करत जवळपास 'मौन व्रत' धारण केलं. सरकारनं हे कायदे मागे घेणार की नाही याचं उत्तर केवळ 'होय' की 'नाही' या शब्दांत द्यावं अशीही भूमिका शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे.


पंजाब किसान युनियनचे नेते रुलधू सिंह यांनी सांगितलं की, "किसान युनियनच्या नेत्यांनी मौन व्रत धारण केलंय. सरकार हे कायदे मागे घेणार की नाही या प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही." पंजाब किसान युनियनचे कायदेशीर सल्लागार गुरलाभ सिंह महल यांनी सांगितलं की, "सरकार हे कायदे मागे घेणार की नाही याच उत्तर 'होय' किंवा 'नाही या शब्दात शेतकऱ्यांना उत्तर अपेक्षित आहे. शनिवारच्या पाचव्या फेरीच्या बैठकीत शेतकरी नेते आपल्या तोंडावर बोट ठेऊन होय की नाही असा फलक हातात घेऊन बसले होते."


Bacchu kadu | 'प्रहार' करण्यासाठी बच्चू कडू मध्य प्रदेशच्या बैतूलहून दिल्लीला रवाना