मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 08:49 PM (IST)
नागपूर : भाजप नगरसेवक ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांच्या मुलानं थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातच दहशत निर्माण करत गोंधळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच नागपुरात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बियर बारमध्ये धिंगाणा घातला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिवनगर परिसरात राहणारा सागर समुद्रे हा तरुण काल संध्याकाळी चुन्नाभट्टी भागात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आला होता. त्यावेळी तो मुन्ना यादव यांच्या घराजवळून गेला. मात्र तू आमच्या परिसरात का आलास असा सवाल करत मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जून यादवनं त्याला दमदाटी केली. सागर समुद्रेनं राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात अर्जून यादवविरोधात तक्रार दिली. याचाच राग मनात ठेवून अर्जून यादव काल रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास 30 ते 35 युवकांसह तलवारी आणि दंडुके घेत शिवनगर परिसरात पोहोचले. मात्र सुदैवानं सागर समुद्रेच्या घराबाहेर बरेच लोक असल्यामुळं त्याला मारहाणीचा डाव फसला. त्यानंतर साडेअकराच्या दरम्यान भाजप नगरसेवक मुन्ना यादव यांनी त्याचा भावासह समुद्रे कुटुंबियांना धमकावल्याचा आरोपही करण्यात येत आहे. याप्रकरणी मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाळा यादव यांच्याविरोधात धमकी देणं आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.