मुंबई: पुण्याचे पालकमंत्रीपद (Pune) भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडून (Chandrakant Patil) काढून घेऊन ते अजित पवारांना (Ajit Pawar) दिल्यानंतर आता चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी एक तास चर्चा केली. यामध्ये पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून त्यांच्याच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्याने ते त्यासंबंधित माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी माहिती दिली. पण पुण्याच्या पालकमंत्रीपदाची आजच घोषणा झाली असून चंद्रकांत पाटलांकडून ते काढून घेऊन अजित पवारांकडे देण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यावर चर्चादेखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर अजूनही त्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारी लवकर देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादीकडून दबाब वाढत होता.
पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या 12 नव्या पालकमंत्र्यांची घोषणा केली. त्यामध्ये पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही चंद्रकांत पाटलांकडून काढून घेण्यात आली आणि त्यांना सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली. पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पण यानंतर चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती.
छगन भुजबळ नाराज?
दरम्यान, नाशिक, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वाद कायम असल्याची माहिती आहे. या तीनही ठिकाणी राष्ट्रवादी आग्रही आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रपदासाठी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आग्रही होते. पण त्यांना पालकमंत्रीपद मिळालं नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.
सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
- पुणे- अजित पवार
- अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
- सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
- अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
- भंडारा- विजयकुमार गावित
- बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
- कोल्हापूर- हसन मुश्रीफ
- गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
- बीड- धनंजय मुंडे
- परभणी- संजय बनसोडे
- नंदूरबार- अनिल भा. पाटील
- वर्धा - सुधीर मुनगंटीवार
ही बातमी वाचा: