Ashish Shelar on uddhav thackeray : आव्हान कुणी कुणाला द्यायचे याबद्दल आरसा आणि आत्मचिंतन करण्याची उद्धव ठाकरे यांना गरज आहे. स्वतःच्या ताकदीवर तुम्ही कधी सरकार आणले का? 100 आमदार तुम्ही आणलेत का कधी निवडून? ज्या अमित शाह यांनी 100 च्यावर आमदार आणले, त्यांना तुम्ही आव्हान देणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 


आदित्य ठाकरेंच्या आक्रोश मोर्चावर निशाणा -
आदित्य ठाकरे यांच्या तळेगाव येथील आंदोलनावर आशिष शेलार यांनी टीकेचा बाण सोडला. आदित्य यांनी आधी किती टक्केवारी घेतली हे सांगावं, त्यांच्यामुळे वेदांत प्रकल्प बाहेर गेला आहे, असा टोला शेलार यांनी लगवाला. कुठलीही लढाई जिकण्याआधी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकिला सामोरे जावे, असेही शेलार म्हणाले.  आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेची भूमिका लोकांना भ्रमित करणारी असून मराठी - गुजरातीचा वाद आणि द्वेष निर्माण करत आहेत. चहाच्या ऐवजी आणखीन काही घ्यायचं ठरवलं आहे असं दिसतंय ते धादांत खोटं बोलत आहेत, असे शेलार म्हणाले. 


दसरा मेळाव्यावर काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं, यावर विचारलं असता आशिष शेलार म्हणाले की, या प्रकरणाशी आमचा काय संबंध आहे. प्रकरण शिंदे गट आणि पेग्विंन सेना मध्ये होते. त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. ज्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तीच खरी शिवसेना आहे. 


नवरात्रीमध्ये भाजपचा प्लॅन काय?
नवरात्रीमध्ये भाजप करत असलेल्या तयारीबाबात भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपने गोविदा आणि गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला. आता भाजप मुंबईत उदे गं अंबे उदे असा जल्लोष करणार आहे. 50 ठिकाणी गरबा, दांडिया आयोजित करणार आहे. मुंबईमध्ये 49 थेट मोठे गरबे, 242 मंडळे जवळपास 300 ठिकाणी उदे गं अंबे उदे चा नारा देणार आहेत. अवधूत गुप्ते यांचा मराठी दांडिया होणार आहे. प्रवीण दरेकर बोरिवली पश्चिम येथे प्रीती पिंकीला घेऊन दांडिया आयोजित करत आहेत. गोपाळ शेट्टी, संतोष सिंग हे प्रमोद महाजन क्रीडांगण येथे फाल्गुनी पाठक याचा गरबा आयोजित करणार आहेत.


पुण्यातील घोषणाबाजीवर संताप व्यक्त केला -
पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावर बोलताना आशिष शेलार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. घोषणा देणाऱ्यांना ठेचून काढले पाहिजे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील तीच भूमिका असेल, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलेय. 


अजित पवार गृहमंत्री खाते - 
आता तर त्यांची एक जखम समोर आली आहे त्यामुळे ते बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी अजित पवार यांच्या गृहमंत्री खात्यासंदर्भातील वक्तव्यावर दिली. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही शेलार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गृहमंत्री कुणालाही भेटू शकतात, त्यांनी वेळ दिला तर मी काय बोलू.. ते भाजपत येणार का ? यावर गृहमंत्री निर्णय घेतील मी काय बोलू... असे शेलार म्हणाले.