नाशिक : पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम ज्या नाशिकमध्ये होतो, त्याच नाशिकमध्ये गोदावरी मोठ्या प्रमाणावर प्रदूषीत झाली आहे. गोदावरी तत्काळ प्रदूषणमुक्त करा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. परंतु, गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.
महाराष्ट्रात नदी प्रदूषणांचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असतानाच नाशिकच्या गोदावरी नदीचा पानवेली, एसटीपी प्लांटमधून निघणारे फेसळालेले पाणी, ठिकठिकाणी नदीला येऊन मिळणारी गटारं आणि सांडपाणी यामुळे श्वास कोंडला गेलाय. नाशिकची एक ओळख म्हणून गोदावरी नदी मानली जाते, महाराष्ट्रातील पवित्र नद्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गोदावरीच्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून हजारो भाविक नाशकात दाखल होत असतात. गोदावरीच्या तिरावर कुंभमेळा देखील भरत असतो. मात्र याच नदीचे पाणी आता आरोग्यासाठी धोकादायक बनले असून शहरातील तपोवन परिसरात तर या गोदामाईला जणू काश्मीरचे रूप आले आहे.
तपोवन परिसरातून दसक मार्गे गोदावरी नाशिकच्या ग्रामीण भागातून पुढे अहमदनगरकडे वाहत जाते. चांदोरी-सायखेडा या गावांना जोडणाऱ्या पुलाखाली तर गोदावरीला पानवेलींनी अक्षरशः विळखा घातला आहे. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. यासोबतच किनाऱ्यांवर दुर्गंधीही पसरली आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून ही सर्व परिस्थिती निर्माण झाली. गोदावरी नदीमध्ये झालेलं हे प्रदूषण पाहून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखिल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तत्काळ हा प्रश्न मार्गी लावा, असे आदेशही त्यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याच्या नावाखाली आतापर्यंत कोट्यावधी रुपये प्रशासनाकडून खर्च केले जातात. मात्र हा पैसा जातो कुठे? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित करत असून प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय.
दरम्यान, गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा हा नाशिककरांना नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा पर्यावरण प्रेमींकडून लावूनही धरला आहे. पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवताच तात्पुरती स्वच्छतेची कामे तर केली जातात. मात्र काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थेच बघायला मिळते. म्हणून आता पालकमंत्री भुजबळांच्या आदेशानंतर तरी झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार का आणि गोदामाई प्रदूषण मुक्त होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक नद्यांची अशीच अवस्था झाल्याने सरकारने नदी प्रदूषणाचा मुद्दा आता गांभीर्याने घेणं गरजेचं असल्याचंही पर्यावरणप्रेमींकडून सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :