धुळे : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दाम्पत्याचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. भुवनेश पाटील असे या मुलाचे नाव असून, भुवनेश हा ओबीसी वर्गातून राज्यात प्रथम आला आहे.


भुवनेश पाटील मूळचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील राहणारा आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन भुवनेशने पुढे नाशिक आणि पुणे येथे उच्च शिक्षण घेतले.

भुवनेशचे आई-वडील शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षक आहेत, तर भुवनेशचा मोठा भाऊ जर्मनीत नोकरीला आहे.

यूपीएससीचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी भुवनेश पुण्यात एका मॉलमध्ये भावाच्या लग्नासाठीची खरेदी करत होता. त्याला ज्यावेळी मित्र आणि नातेवाईकांचे फोन आले, त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.

मनात कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता यूपीएससीच्या परीक्षेला मराठी विद्यार्थ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. आपला छंद, आवड कायम ठेवून यूपीएससीचा अभ्यास केल्यास यश हमखास मिळतं, असं भुवनेश पाटील याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.