जळगाव : पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उद्या (15 जानेवारी) ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एकनाथ खडसे यांना नोटीस पाठवत 3 डिसेंबरला चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजावला होता. मात्र, कोरोनाची लागण झाल्याने ते हजर राहू शकले नव्हते.


एकनाथ खडसे यांचा क्वॉरंटाईन काळ संपल्याने उद्या एकनाथ खडसे ईडी चौकशी करता हजर राहणार असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांनी एबीपी माझा दिली आहे. खडसे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. एकनाथ खडसे मुंबईत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.


काय आहे प्रकरण?
पुण्यात भोसरी जमीन (Bhosari MIDC land purchase) घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने क्वॉरंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वॉरंटाईन पिरिअड संपल्यावर उद्याच खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. जमीन व्यवहार (Bhosari MIDC land purchase) या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


ईडी लावली तर मी सीडी लावेन : खडसे
भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे. याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे, ही पाचवी आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी केले आहेत. आता देखील सहकार्य करेन. मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही, असं एकनाथ खडसे ईडीच्या नोटीसबाबत म्हणाले होते.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडीची नोटीस मिळेल, असंही ते म्हणाले होते.