मुंबई : भिवंडी डेपोबाहेर एसटीचालकाला झालेल्या मारहाणीचे परिणाम राज्यभरात पाहायला मिळाले. मारहाणीचा निषेध करण्यासाठी शनिवारी मुंबई सेंट्रल आणि परळच्या एसटी डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं.


सकाळी सात ते नऊ वाजताच्या दरम्यान हे आंदोलन सुरु होतं. भिवंडी डेपोबाहेर रिक्षा हटवण्यावरुन झालेल्या वादानंतर रिक्षाचालकानं एसटीचे बसचालक प्रभाकर गायकवाड यांना मारहाण झाली होती. मारहाणीनंतर प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला.

भिवंडीत बसचालकाच्या मृत्यूचे ठाणे डेपोतही पडसाद


नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. यामुळे आगारातील कामकाज ठप्प झालं असून पनवेलमधून सुटणाऱ्या गाड्या बंद आहेत. फक्त बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या गाड्या सुरु आहेत.

रिक्षाचालकांची बेदम मारहाण, भिवंडीत एसटी चालकाचा मृत्यू


ठाणे डेपोच्या एसटीचालकांनीही गुरुवारी बंद पुकारला होता. ठाणे डेपोमधून भिवंडी, बोरीवली, मीरा-भाईंदर, वसईकडे जाणारी वाहतूक बंद होती. ठाण्यातून खोपटमधील एसटी डेपोही पूर्णपणे बंद असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बसचालकाच्या मृत्यूचे पडसाद नांदेडमध्येही पाहायला मिळाले. नांदेडमधील देगलूर बस डेपोतील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भिवंडीमधील हे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरु लागलं आहे.

काय आहे प्रकरण?


एसटी बसचालक प्रभाकर गायकवाड बुधवारी रात्री ड्युटीवर होते. डेपोमध्ये बस नेत असताना गेटजवळ रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाड यांनी चालकाला रिक्षा हटवण्यास सांगितलं. रिक्षाचालकाने त्यांना न जुमानता रिक्षा हलवली नाही. त्यावेळी एसटी आत नेताना रिक्षाला बसचा धक्का लागला.

याच रागातून रिक्षाचालकाने गायकवाड यांना जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि आजुबाजुचे रिक्षाचालकही मदतीला आले. सर्व रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली.

या घटनेची तक्रार करण्यासाठी गायकवाड पोलिस स्थानकात गेले असता तिथेच चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.