भिवंडी: येत्या 24 मे रोजी भिवंडी महापालिकेसाठी मतदान होत आहे. भिवंडी महापालिकेची ही चौथी सार्वत्रिक निवडणूक आहे.


मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना सर्वपक्षीयांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

भिवंडी महानगरपालिकेचा 500 कोटींचा अर्थसंकल्प आहे. यंदा तब्बल 478 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये राजकीय पक्षांचे 309 आणि अपक्ष 169 जणांचा समावेश आहे.

अन्य निवडणुकीप्रमाणे भिवंडीतही आई-मुलगा, पती-पत्नी, बहीण-भाऊ अशा नात्यागोत्यातील माणसं एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

या निवडणुकीत 111 अंसारी, 22 मोमीन, 47 शेख, आणि 21 खान, तर 20 चौधरी, 12 सिद्दीकी, 28 पाटील अशा विविध आडनावांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

ही निवडणूक 23 प्रभागात होत आहे. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता कमीच आहे.

यंदा शिवसेना, भाजप, काँग्रेस हे महत्त्वाचे पक्ष आपली सर्व शक्ती पणाला लावून स्वतंत्र लढत आहेत. याशिवाय स्थानिक कोणार्क विकास आघाडी आणि समाजवादी पक्ष यांचं तगडं आव्हान आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील , भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आदी प्रमुख नेत्यांनी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी जोरदार तयारी करून प्रचार सुरू केला आहे.

काँग्रेस पक्षांमध्ये बंडखोरीचे वातावरण असल्याने उमेदवारांसह पदाधिकारी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांच्यावर भयंकर नाराज आहेत. भाजपचे खासदार कपिल पाटील महापालिकेत भाजपची सत्ता स्थापण्यासाठी तर शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून येण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्वपदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत.