भिवंडीत लिपिक महिलेच्या पतीचा कान कापला
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2016 06:19 AM (IST)
भिवंडी : लिपिक महिलेच्या ग्रामसेवक पतीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात आरोपींनी पीडित तरुणाचा कान कापल्याची माहिती आहे. जखमी निलेश गोरलेंवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असताना महिला लिपिकाची नेमणूक केली, त्याशिवाय मदरशाला परवानगी दिल्यामुळे वाद उसळला होता. याच रागातून लिपिक महिलेच्या ग्रामसेवक पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी डोहळे नाक्यावर निलेश यांची स्विफ्ट कार अडवली. त्यानंतर लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात निलेश यांच्या डोक्यावर वार करुन उजवा कानही कापण्यात आला. भिवंडीतील भोकरी परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात सात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चौघांना सोमवारी अटक करण्यात आली.