मुंबई: कोरेगाव-भिमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहेत. शिवप्रतिष्ठानने विविध जिल्ह्यात सन्मान मोर्चांचं आयोजन केल आहे.

या मोर्चासाठी सांगलीत मोठी तयारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात जमत आहेत.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सांगली शहरात बंदोबस्त ठेवला आहे.  पोलिसांनी काल शक्तीप्रदर्शन करत पथसंचलन केलं. त्यानंतर आज स्वत: पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनीही रस्त्यावर उतरुन सुरक्षेचा आढावा घेतला.

LIVE UPDATE


सोलापूर : सोलापुरातही संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. चार हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ जिल्हाभरातून कार्यकर्ते सोलापूर शहरात दाखल झाले होते. मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



नागपूर : शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने नागपुरात सकाळी हिंदू सन्मान मोर्चा आयोजित करण्यात आला. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे महाल येथील शिवाजी चौकावर धरणे प्रदर्शनापर्यंत हे आंदोलन मर्यादित झालं. आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली. भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांना नाहक गोवलं जात आहे, खऱ्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



सांगली: मोर्चाच्या सुरुवातीला महिला आणि मुली, त्यानंतर शिवप्रतिष्ठानचे धारकरी असणार





सांगली: मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमायला सुरुवात. काही वेळातच सांगलीत मोर्चाला सुरुवात होणार.

पुणे -  थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर- शिवराज्याभिषेक सोहळा समितीने महालमधल्या शिवाजी चौकात आंदोलन केलं. यावेळी दंगली मागच्या खऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, सांगली किंवा साताऱ्यातील मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी होण्याची शक्यता आहे.  भिडे गुरुजी हे वडिलधारे आहेत, असं उदयनराजे म्हणाले होते.

दुसरीकडे मुंबई आणि पुण्यातील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

मुंबईत भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मात्र आझाद मैदानात सभेची परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात सुरक्षेचं कारण पुढे करत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतही सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात जमून, लालमहालापर्यंत चालत जाण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठाननं केला आहे.

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान मोर्चा –

मुंबई - 'शिवप्रतिष्ठान'तर्फे भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान येथे सभा घेण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

पुणे – संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निघणारा शिवप्रतिष्ठानचा मोर्चा शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र संघटना ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्र ते कसबा गणपती आणि लाल महालापर्यंत मोर्चा काढण्यावर ठाम आहे. (सकाळी 10 वाजता मोर्चाची नियोजित वेळ आहे.)

सांगली – संभाजी भिडेंच्या समर्थनासाठी सकाळी 10 वाजता मोर्चाला विश्राम बाग येथून सुरुवात होईल. जिल्ह्यातले सर्व मोर्चे स्टेशन चौकात एकत्र येतील. त्यानंतर एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देईल.

कोल्हापूर – सर्व हिंदू संघटनांचा संभाजी भिडेंच्या समर्थनासाठी मोर्चा निघणार आहे, सकाळी 10.30 वाजता, बिंदू चौक.

सोलापूर – संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ हुतात्मा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा, सकाळी 10 वाजता.

रत्नागिरी – शिवप्रतिष्ठानचा मोर्चा, सकाळी 11 वाजता.

नाशिक – हिंदूत्ववादी संघटनाचा मोर्चा, सकाळी 11 वाजता.

धुळे - भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्वावादी संघटनांचा मोर्चा, सकाळी 10 वाजता.

नागपूर – संभाजी भिडेंच्या समर्थनासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून आंदोलन करण्यात येणार आहे, सकाळी 8.30 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौक.

अमरावती – भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्वावादी संघटनांचा मोर्चा, सकाळी 11 वाजता.

अहमदनगर- भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्वावादी संघटनांचा मोर्चा सकाळी 10 वाजता.

संबंधित बातम्या

उदयनराजेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी