कोल्हापूर : महाराष्ट्र बंददरम्यान उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हादंडाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे आदेश दिले आहेत.


समाजामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या मेसेज आणि व्हिडीओंचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार होऊन, जातीय तेढ निर्माण होईल. त्याद्वारे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडेल. यामुळे 3 जानेवारी 2018 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 4 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलं आहे.

आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.



भीमा कोरेगाव दगडफेकीचे कोल्हापुरात मोठे पडसाद उमटले आहेत. सकाळी दलित संघटनांच्या आंदोलकांनी मोर्चा काढत तुफान तोडफोड केली. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रतिमोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करत, दलित आंदोलकांनी बिंदू चौक परिसरात लावलेल्या गाड्या फोडल्या.

यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदुत्ववादी आणि दलित कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.