Bharat jodo in Akola : राहुल गांधींची भारत जोडो (Rahul Gandhi) पदयात्रा आज अकोला जिल्ह्यात आहे. ही यात्रा आज जिल्ह्यातील (Akola News) वाडेगावातून जात आहे. या यात्रेनिमित्तानं वाडेगावासंदर्भात इतिहासाच्या सोनेरी पानाचा एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. हा योगायोग आहे 'गांधी टू गांधी' असा. काय आहेय हा योगायोग पाहूयात.


वाडेगाव... अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातलं मोठं गाव... मात्र याच वाडेगावाच्या अनेक ओळखी आहे. यातील मोठी ओळख म्हणजे 'स्वातंत्र्य सैनिकांच गाव'. लिंबूचं गाव. अकोला जिल्ह्यातील मोठी बाजार, अशा अनेक ओळखी वाडेगावानं जपल्या आहेत. स्वातंत्र्य संग्राम चळवळीत या गावानं तब्बल 150 स्वातंत्र्य सैनिक दिलेत. यातूनच महात्मा गांधींची मोठी सभा 18 नोव्हेंबर 1933 ला वाडेगावात झाली होती. याच सभेत महात्मा गांधींनी वाडेगावाचा उल्लेख 'विदर्भाची बार्डोली' असा केला होता. स्वातंत्र्य चळवळ वाढविण्यासाठी गांधीजींनी गुजरातमधील धनजीभाई ठक्करांना वाडेगावात रहायला पाठविलं होतं. त्यांच्याच नेतृत्वात वाडेगावात स्वातंत्र्य चळवळ फुलली. ही सभा पाहिलेली काही माणसं आजही हयात आहेत. याच गावात बरोब्बर 89 वर्षांनी राहुल गांधींच्या रूपानं दुसरा 'गांधी' येतो आहे. राहुल गांधी आज दुपारनंतर वाडेगावात येत आहेत. गावकरी राहूल गांधींच्या स्वागतासाठी पार आतूर झाले आहेत. 


धनजीभाई ठक्कर यांनी बनवलं 'वाडेगावा'ला स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र : 


महात्त्मा गांधींची वाडेगावाला जाहीर सभा झाली होती.मुंबईत झालेल्या भाषणातून महात्मा गांधी यांनी खरा भारत खेड्यात आहे, खेडूत जनतेची सेवा करा असा संदेश दिला. या भाषणाने प्रेरीत होऊन मुंबईतील गुजराती गृहस्थ धनजीभाई ठक्कर भारावले. मुंबईतील शहरी जीवन सोडून अकोला जिल्हा परिसरात देशभक्तीच्या प्रचार-प्रसार कार्यात लागले. त्यांना अकोल्यातील मशरूवाला परिवाराची साथ होतीच. अकोला जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी चळवळ उभारली. त्यामुळे हजारो लोक स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊ लागले. अकोल्यापेक्षाही मोठा प्रतिसाद बाळापूरच्या वाडेगाव आणि पारस परिसरात मिळत असल्याने धनजीभाई वाडेगाव येथेचं स्थायीक झाले. वाडेगावातूनच मग मोहिम चालवायचे. कै.वीर वामनराव मानकर, कै.अवधूतराव मानकर ,कै.सदाशिव चिंचोळकर, युसूब बेग काझी,कै. महादेव नटकूट, शंकर मानकर यांनी खांद्याला खांदा लावून धनजीभाईंना मोलाची साथ दिली. वाडेगाव येथील मानकर परिवाराचा यामध्ये मोठा पुढाकार होता. जिल्ह्याचे प्रमुख क्रांतीकारक ब्रिजलाल बियाणी सतत वाडेगावला येवून सभा घेत असत.1921 च्या असहकार आंदोलनात येथील स्वातंत्र्य सैनिकांचा प्रमुख सहभाग होता. 1927 मध्ये अकोला येथील रामगोपाल अग्रवाल यांच्या वाडेगाव येथील जागेत धनजीभाईंनी कार्यालय उघडले. 1932 च्या मिठाच्या सत्याग्रहात वाडेगाव, पारस, आलेगाव येथील लढवय्ये सहभागी झाले. 


वाडेगावाची किर्ती ऐकून महात्मा गांधी आलेत वाडेगावात :


वाडेगावची कीर्ती अकोला जिल्ह्यातच नव्हे तर देशात गाजू लागली. महात्मा गांधीपर्यंत ही बातमी पोहोचली. वाडेगावची दखल घेत महात्मा गांधी 18 नोव्हेंबर 1933 ला त्यांनी येथे सभा घेण्याचा निर्णय घेतला. हरिजन सेवक संघाच्या कार्याकरीता महात्मा गांधी 17 नोव्हेंबर रोजी अकोला परिसरात दौऱ्यावर आले. अमरावतीहून कारंजा मार्गे मूर्तिजापूर , येथून रेल्वेमार्गे शेगाव, तेथून खामगाव येथे गेले. येथे मुक्काम करून 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्हा दौरा सुरू झाला. सकाळी आठ वाजता ते वाडेगाव येथे पोहोचले. गांधीजींचे भव्य स्वागत येथे झाले. बैलगाड्या भरभरून त्यांच्या सभेला माणसांची गर्दी झाली. त्याकाळी एक लाख लोकांनी सभेला गर्दी केली होती. वाडेगावच्या निगुर्णा नदीच्या पात्रात ही भव्य जाहीर सभा झाली. त्याच वेळी त्यांनी वाडेगावला 'बार्डोली ऑफ बेरार' असे संबोधून वाडेगाववासियांचा सन्मान केला. स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे भाषण महात्मा  गांधींचे येथे झाले होते. याच दरम्यान राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी अकोल्यातील राष्ट्रीय शाळेला भेट दिली. राष्ट्रीय शाळेत दोनदा महात्मा गांधीनी भेट दिल्याच्या नोंदी आहेत. पहिल्यांदा जेव्हा गांधीची येथे आले होते. तेंव्हा त्यांनी साबरमतीच्या आश्रमातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या गणपत बोराळे या शिक्षकाची आत्मीयतेने चौकशी केली होती. 


89 वर्षांनंतर 'दुसरा गांधी' पोहोचला वाडेगावात : 


एकेकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगावच्या निगुर्णा नदीच्या पात्रात भव्य जाहीर सभा घेतली. त्याच वेळी त्यांनी वाडेगावला बार्डोली ऑफ बेरार असे संबोधून वाडेगाववासियांचा सन्मान केला. स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे भाषण महात्मा गांधींचे इथेच झाले होते. आता 89 वर्षानंतर पुन्हा एक गांधी अकोला जिल्ह्यातील वाडेगावात येतायेत. ज्या गावात महात्मा गांधी यांनी सभा घेतली होती त्याच गावातून आता राहुल गांधी पदयात्रा करणार आहेत. या गावात आजही महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना पाहिलंय. आता गावातील लोकांना गांधी परिवारातील पुढची पाती असलेल्या राहुल गांधींना पाहण्याची उत्सुकता आहे. 


राहुल गांधींच्या स्वागताची वाडेगावात जय्यत तयारी : 


राहूल गांधींच्या स्वागतासाठी वाडेगावात जय्यत तयारी केली आहे. राहूल गांधींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाडेगावकरांनी स्वागत कमानी, बॅनर, होर्डींग्ज लावत यात्रेचं स्वागत केलं जात आहे़. धनजीभाई ठक्कर यांचं निवासस्थान असलेल्या गांधी स्मारकासमोर यात्रेचं स्वागत करीत पुष्पवृष्टी केली जाणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेमुळे इतिहासाची अनेक पानं नव्यानं चाळवली जात आहेत. वाडेगावाचा इतिहास हा त्याच सुवर्ण आठवणींनी पुन्हा उजाळला गेला आहे. 


ही बातमी देखील वाचा


Rahul Gandhi : ...तर, भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी; राहुल गांधींचे आव्हान