मुंबई: झारखंडमधील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थ क्षेत्राला केंद्र सरकारने पर्यटन स्थळ घोषित केल्याने सकल जैन समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय. सम्मेद शिखरजी हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे सांगत जैन समाजातील बांधवांकडून निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. या निर्णयाच्या विरोधात अनेक राज्यात आंदोलन होत असून याचे लोन आता महाराष्ट्रात देखील पोहचले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जैन बांधवांनी व्यवसाय बंद ठेवत निषेध नोंदवला आहे.
पुण्यातील जैन व्यापाऱ्यांची पंधरा हजार दुकाने बंद
पुण्यातील प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेला लक्ष्मी रस्त्यावर आज तुरळक गर्दी आहे. जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा क्षेत्राचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. श्री सम्मेद शिखर हे झारखंडमधील जैन समजाचे तीर्थक्षेत्र आहे. या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र जैन समाजाकडून या निर्णयाला विरोध असल्याकारणाने आज पुण्यातील दुकाने बंद पाहायला मिळाली. हा निर्णय मागे घेतला नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा जैन धर्माच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे
हिंगोलीत जैन धर्मियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
आज हिंगोली येथे जैन धर्मियांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज हिंगोलीत जैन समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शने केली आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाजातील महिला त्याचबरोबर पुरुष सहभागी झाले होते.
नांदेड येथे जैन धर्मियांच्यावतीने केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शने
नांदेड येथे जैन बांधवांनी केंद्र सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. जैन संघटनाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बारामतीत दुपारी 12 पर्यंत दुकाने बंद
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा क्षेत्राचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ बारामतीत आज सकल जैन बांधवांच्या वतीने आज बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत बारामतीतील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. जैन बांधवांच्यावतीने आज शहरातून महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात मोठ्या संख्येने महिलांचं युवा वर्ग व्यापारी वर्ग व जैन बांधव सहभागी झाले. प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सोलापुरात मूक मोर्चा
सोलापुरात सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील श्री आदिनाथ जैन मंदिर, शुक्रवार पेठ पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माणिक चौक, दत्त चौक, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा, पूनम गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला हा मोर्चा जाणार आहे. दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे.