मुंबई : केंद्र सरकारचे तीन काळे कृषी कायदे तसेच इंधनाचे वाढलेले दर याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे. राज्यात देखील ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं गेलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. मुंबईसह राज्यभरात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. 
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,  केंद्र सरकारचे तीन काळे कृषी कायदे, इंधनाचे वाढलेले दर याविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे.  आज देशात बंदची हाक असताना पंतप्रधान विदेश वारीवर आहेत. दिल्ली सीमेवर आंदोलनात 300 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झालेत.  पण आपले पंतप्रधान निगरगट्ट झाले आहेत.  रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना शेतकर्‍यांशी चर्चा करायला पुढे पाठवतात, ज्यांचा शेतीशी संबंध नाही. अशी चेष्टा केंद्र सरकारने शेतकऱ्यांची चालवली आहे, असं पटोले म्हणाले. 


कृषी अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायचीय- पृथ्वीराज चव्हाण 
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी आमची मागणी आहे.  विरोधकांशी चर्चा करून नवीन कायदे करावेत.  सध्या हे कायदे दीड वर्षासाठी स्थगिती केले आहेत. आमची मागणी आहे चर्चा करून नवीन कायदे करा. पण यांना कृषी अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायची असल्याने मोदी सरकार हे करणार नाही, असं चव्हाण म्हणाले. ते म्हणाले की,  कोरोना काळात सरकारला झालेला तोटा भरून काढण्यासाठी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर आकारत आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत, मात्र आपल्या देशात किंमती कमी होत नाहीत, असंही ते म्हणाले. 
 
सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे धरणे


केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सोलापुरात आंदोलने झाली. संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी माकपने जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आंदोलन करायचे ठरवले होते. मात्र आंदोलन करण्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे काँग्रेसतर्फे देखील कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं. सोलापुरातील काँग्रेस भवनसमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देखील  दिल्या.


श्रीरामपूर येथे आंदोलन, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात सहभागी 
केंद्राच्या धोरणाविरोधात काँग्रेसने श्रीरामपूरमध्ये आंदोलन केले.या आंदोलनात  महसुलमंत्री बाळासाहेब थोरात सहभागी झाले.  श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेली थोरात म्हणाले की, मोदी सरकारने केलेले काळे कायदे साठेबाजांकरिता आहेत. ते शेतकरी विरोधात आहेत. शेतकऱ्यांना जाच आणि नफेखोरांमुळे सामान्य जनतेचं जीवन कठीण होणार आहे, असं थोरात म्हणाले. 


 कोल्हापूरमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन
कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलन स्थळी गॅस सिलेंडरची मोठी प्रतिकृती लावून इंधनाचे दर कशा प्रकारे वाढले हे दाखविण्यात आलं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत त्याचबरोबर इंधनाचे वाढलेले भरमसाठ दर कमी करावेत अशी मागणी करत केंद्राच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला. 


चिपळूणमध्ये काँग्रेसकडून उपोषण
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात आज चिपळूणमध्ये काँग्रेसकडून उपोषण करण्यात आलं.चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव तसेच काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं. हे काळे कायदे मोदी यांना मागे घ्यावेच लागतील. मोदींना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.