भंडारा : भंडाऱ्यातील उमरेड पवनी कराडला या अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यू वन्यजीव प्रेमींसाठी दु:खद बातमी होती. या दोन वाघांचा मृत्यू विषप्रयोगानं झाल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.
अभयरण्यातील टी-16 नर आणि टी -4 मादा या वाघिणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र विषप्रयोग करुन या वाघांची शिकार करण्यात आल्याची दुर्दैवी बाब आता समोर आली आहे. दोन्ही वाघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक अंदाजनुसार विष पोटात गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर येत आहे.
दोन्ही वाघांच्या मृत्यूस वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केला असून संबंधित वनअधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
कधी काळी भंडाऱ्यातील उमरेड पवनी कराडला या अभयारण्याची शान असलेल्या जय वाघाची विशेष ओळख होती. मात्र जय वाघ अचानक गायब झाल्यामुळे वन्यप्रेमी तसेच त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली होती. मात्र त्यानंतर त्याची जागा शावक जयचंद याने घेतली.
मात्र काही दिवसांपूर्वी तोही बेपत्ता झाल्यामुळे या अभयारण्यात कमी वाघ शिल्लक होते. त्यात टी-16 आणि टी-4 या वाघांच्या मृत्यूने वाघांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी सरकारने आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे.