भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री अतिदक्षता विभागात आग लागून 10 निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भंडाऱ्यात येऊन पाहणी केली मात्र तरीही दोषींवर कारवाई न झाल्यानं भाजपकडून उद्या, सोमवारी भंडारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री येऊन गेले व आज राज्याचे मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यात येऊन सुद्धा दोषींवर कारवाई झाली नसल्याने जिल्हा भाजपाच्या वतीने उद्या भंडारा बंद ठेवण्यात येणार आहे. हे प्रकरण लवकरात लवकर तपास करुन दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार मेंढे यांनी केली आहे.




मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, म्हणाले दोषींवर कडक कारवाई केली जाईल
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाची देखील पाहणी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, हे दुःख न भरून निघणारे आहे, मी सांत्वन करायला आलो आहे. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती बनविली आहे, यात मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुखही असणार आहे. या समितीत सहा सदस्य राहतील, महिन्याभरात त्याचा अहवाल येईल, त्यानंतर आम्ही आवश्यक कारवाई करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, दुर्घटना घडली त्याबद्दल कोणतेही शब्द माझ्याकडे नाहीत. हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.




मुख्यमंत्री म्हणाले की, घटनास्थळ पाहिले पीडित कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले. काही उपकरणांबद्दल, यंत्रणेबद्दल काही मागण्या आल्या होत्या का हे पाहावे लागेल. कोरोना संदर्भात काम करताना आरोग्य यंत्रानेबद्दल काही दुर्लक्ष झाले आहे का हे अहवालात समोर येईल, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर एन्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, असंही ते म्हणाले. या घटनेवरुन थेट राज्याच्या आरोग्याच्या स्थितीवर जाऊ नका आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे, असंही ते म्हणाले.


Bhandara Hospital Fire | राष्ट्रपती, पंतप्रधानही हळहळले; मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश