Gopichand Padalkar : ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जीवे मारण्याची सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या विरोधात भंडाऱ्यात ख्रिस्ती बांधवांनी मोठं आंदोलन केलं. सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या पडळकर यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. त्रिमूर्ती चौकात एकत्र आलेल्या बांधवांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

राज्य सरकारनं गोपीचंद पडळकर यांच्यावर समाजासमाजात तेढ निर्माण केल्यामुळं  आमदारकी रद्द करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना ख्रिस्ती बांधवांनी याचं निवेदन दिलं आहे.

मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्याच्या विविध भागात उमटत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहेत. मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरत असून गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे. जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर आणि विरोधात कारवाई होणार नाही तोपर्यंत विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढून असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीस ठेवले जातात त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवले पाहिजेत. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचे बक्षीस दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखांचे तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांचे जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला अकरा लाखांचे बक्षीस ठेवले पाहिजे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. सांगलीतील यशवंत नगर येथे धर्मासाठी तगादा लावलेल्या सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. गाव खेड्यातल्या लोकांना बळी पाडून, आमिष दाखवून त्यांना धर्मांतरण करायला लावताय .हे कसं चालेल .  आम्ही धर्माचं रक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये गावातील सगळ्यांनी राहिला हवं .आम्ही कोणाला धर्मांतरण करण्यासाठी जात नाही .दबाव टाकत नाही . जबरदस्ती करत नाही . त्यामुळे कुणीही गाव खेड्यात असे उद्योग करायला येऊ नये .जर अशा पद्धतीने धर्मांतर करण्यासाठी कोणी गावात आला तर त्याला योग्य प्रकारे उत्तर द्या ही आमची आज उद्या आणि कायम हीच भूमिका आहे असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

VIDEO Gopichand Padalkar : धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी 'सैराट' करेल त्याला 11 लाखांचे बक्षीस; गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य