नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याआधी तीनवेळा भय्याजी जोशी यांनी संघाच्या सरकार्यवाहपदाची धुरा समर्थपणे पेलली आहे. आज झालेल्या बैठकीत चौथ्यांदा त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या पदाच्या शर्यतीत दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचीही चर्चा होती.
आज नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भय्याजी जोशींची चौथ्यांदा संघाच्या सरकार्यवाहपदी निवड करण्यात आली. 2018 ते 2021 या तीन वर्षांसाठी ही निवड असेल.
भय्याजी जोशी हे 2009 पासून संघाच्या सरकार्यवाहपदी कार्यरत आहे. दर तीन वर्षांनी संघाच्या सरकार्यवाहपदाची निवडणूक होते. यात सलग चौथ्यांदा भय्याची जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
संघाच्या सरकार्यवाहपदी सलग चौथ्यांदा भय्याजी जोशीच का?
संघाच्या सरकार्यवाहपदाच्या शर्यतीत दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचीही चर्चा होती. दत्तात्रय होसबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांची सरकार्यवाहपदी निवड झाली असती तर भाजपला आगामी निवडणुकांमध्ये त्याचा फायदाच झाला असता. मात्र संघाच्या गोटात चुकीचा संदेश जाऊ नये आणि त्याचा धक्का संघटनाला बसू शकला असता म्हणून भय्याजींनाच या पदी निवड झाल्याची चर्चा आहे.
याशिवाय भय्याजी जोशी यांची कार्यशैली संघाच्या पारंपरिक कार्यशैलीसारखीच होती. भय्याजी जोशी सक्रिय राजकारण आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं पसंत करतात. दत्तात्रय होसबळे सक्रिय राजकारणाशी जास्त जोडले असल्याने त्यांचं नाव मागे पडल्याचंही बोललं जात आहे.
दरम्यान भय्याजी जोशी हे अगदी सुरुवातीपासून संघाशी जोडले गेले आहेत, तर होसबळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून संघप्रचारक बनले आहेत. त्यामुळे भय्याजींनाच सरकार्यवाहपदी निवडलं गेलं असंही बोललं जात आहे.
भय्याजी जोशी यांचा कार्यकाळ
2009 ते 2012
2012 ते 2015
2015 ते 2018
आगामी 2018 ते 2021
संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची सलग चौथ्यांदा फेरनिवड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Mar 2018 05:38 PM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याआधी तीनवेळा भय्याजी जोशी यांनी संघाच्या सरकार्यवाहपदाची धुरा समर्थपणे पेलली आहे. आज झालेल्या बैठकीत चौथ्यांदा त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या पदाच्या शर्यतीत दत्तात्रय होसबळे यांच्या नावाचीही चर्चा होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -