मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये सुद्धा लोकसभेच्या तोंडावर धुमाकूळ सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार का? अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होत होती. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव होते ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे. अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सातत्याने होत होती आणि आज राजीनामाच्या रुपाने पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे.
ही परिस्थिती एका बाजूनेच असताना त्यांचे समर्थक आमदार किती त्यांच्यासोबत जाणार याची सुद्धा चर्चा रंगली आहे. दरम्यान, अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार अशीही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे अफवा उठल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांना खुलासा करावा लागला आहे. त्यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाई जगताप काँग्रेस सोडणार अश्या वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा काँग्रेस चा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही. पद, लालच आणि फायद्याकरिता माझा पिंड बनलेला नाही आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही नाही. अनेक वादळ आली आणि गेली, काँग्रेस कोणीही संपवू शकलं नाही आणि कोणाच्याने संपणार ही नाही. काँग्रेस पक्षाला गतवैभव पुन्हा मिळवून देऊ त्याकरिता प्रचंड कष्ट घेऊ! माझी शेवटची शोभा यात्रा काँग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल याची सर्वांनी खात्री बाळगा! #जय_काँग्रेस✋
दुसरीकडे, अशोक चव्हाण यांच्या समर्थक आमदारांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांना सुद्धा खुलासा करण्याची वेळ आली. त्यांनी अजूनही काँग्रेस सोबत असल्याचे सांगत काठावर असल्याचे स्पष्ट केलं आहे, दुसरीकडे अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याने आता त्यांच्यासोबत किती आमदार जाणार याची चर्चा आहे. महाविकास आघाडीकडून राज्यात महायुतीला रोखण्यासाठी बैठकांवरती बैठका सुरू असताना अशोक चव्हाण हे त्या बैठकांमध्ये सहभागी होते. आता तेच अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर गेल्याने मोठा धक्का बसला आहे. इतकंच नव्हे, तर अनेक काँग्रेस नेत्यांनी हे धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या