मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. त्यामुळे विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची आजही हाल होण्याचे चिन्हे आहेत. काल बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संपच सुरुच राहणार आहे.
शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने काल संपातून माघार घेतली होती. सुरुवातीला कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी कामावर रुजू होणार ,अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र मुंबई सेंट्रल व्यतिरिक्त अजून कोणत्याही बस डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. तर शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास यांनी इतर बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांना जाण्यापासून काही कर्मचारी रोखत आहेत, असा आरोप केला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस आहे. काल बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात बैठक झाली होती. परंतु यात कोणताही तोडगा न निघाल्याने संप सुरुच ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला होता. बेस्टच्या संपामुळे काल दिवसभर प्रवाशांचे हाल झाले होते. आजही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी आजही बैठकांचे सत्र कायम राहील.
दुसऱ्या दिवशीही संप सुरुच असल्याने प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
संपाला फुटीचे ग्रहण
या संपाला फुटीचं ग्रहण लागताना काल दिसून आले. काल शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतली होती. सुरुवातीला कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी कामावर रुजू होणार, अशी घोषणा करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संघटनेत असलेला बेबनाव समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना तोंडावर आपटण्याची चिन्हे आहेत.
मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा
सध्या मुंबई विद्यापीठाअंतर्गत विविध विषयांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने बेस्टच्या संपाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला विद्यार्थी उशिरा पोहोचले तरी त्यांना परीक्षेला बसू द्यावे, अशा सूचना महाविद्याल्यांना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बेस्टचा संप, टॅक्सीचालकांची मुजोरी
बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल टॅक्सीचालकांची मुजोरी पाहायला मिळाली. टॅक्सीचालक प्रवाशांकडून चौपट दर वसूल करत आहेत. मीटर किंवा शेअर टॅक्सीच्या दरांऐवजी प्रतिप्रवासी भाडे आकारणी करुन मुंबईकरांची पिळवणूक सुरु आहे. भायखळा ते जेजे ब्रीज या एक ते दीड किमी अंतरासाठी तब्बल 80 रुपये भाडं आकारलं जात आहे. शिवाय खाजगी बसही जादा पैसे प्रवाशांकडून घेत आहेत. त्यामुळे अनेकजण जवळच्या प्रवासासाठी लिफ्ट घेऊन प्रवास करत होते.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
- 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
- अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी
दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jan 2019 07:54 AM (IST)
संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिल. त्यामुळे विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची आजही हाल होण्याचे चिन्हे आहेत. काल बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संपच सुरुच राहणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -