नवी दिल्ली : दिल्लीत दाखल झालेले नारायण राणे भाजप प्रवेशासंदर्भात ठोस निर्णय घेऊनच राज्यात परततील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र नारायण राणेंनी दिवसभर दिल्लीत तळ ठोकूनही त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात ठोस निर्णय झाला की नाही, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेण्यासाठी नारायण राणे सकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतल्या घरी नारायण राणे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काही वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र नंतर परिवहन खात्यातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी ते निघून गेले.
या बैठकीनंतर नारायण राणे, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे एकाच गाडीतून अमित शाह यांच्या घरी दाखल झाले. अमित शाह यांच्या घरी सर्व नेत्यांमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र अजून समोर आलेलं नाही.
राणेंसाठी भाजपचे दरवाजे उघडले?
नारायण राणे हे सिंधुदुर्गातल्या हॉस्पीटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी दिल्लीत आले होते. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा अजब दावा बैठकीनंतर रावसाहेब दानवेंनी केला. मात्र एवढं जाहीरपणे दिल्लीत येणं, भाजप नेत्यांच्या गाडीत फिरणं, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि पक्षाध्यक्षाशी चर्चा करणं यांमुळे एकंदरीत राणेंसाठी भाजपचे दरवाजे उघडले आहेत, असं बोललं जात आहे.
राणेंचा काँग्रेसला रामराम
“तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची आश्वासनं दिली मात्र कधीच पाळली नाही. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या 12 वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही,” असं म्हणत राणेंनी काँग्रेसवर आसूड ओढलं. “आम्ही राणेंना घाबरतो, असं काँग्रेस समोरुन दाखवत असे. पण दिल्लीत मला वेळ मिळायची नाही,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
अमित शाहांसोबतची बैठक संपली, राणेंचा भाजप प्रवेश गुलदस्त्यातच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 10:17 PM (IST)
नारायण राणेंनी दिल्लीत दिवसभर तळ ठोकूनही त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात ठोस निर्णय झाला की नाही, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -