बेळगाव : कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील याने वादग्रस्त वक्तव्य केल्याचे परिणाम बस सेवेवर पडल्याचे दिसू लागले आहे. कनसेचा बेळगावात उन्माद सुरुच असल्याने कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सीमा प्रश्नावरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी दोन्ही राज्यांच्या परिवहन महामंडळांना दिले आहेत.


दरम्यान, कनसेचा भीमाशंकर पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. त्यानंतर, या घनटेच्या निषेधार्थ शिवसेनेकडून बेळगाव बस स्थानकापासून निषेध रॅली काढण्यात येणार आहे.


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्या कनसेने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केले. कनसेचे भामटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बेळगावातल्या दुकानांवरील मराठी पाट्यांची तोडफोडही केली. या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ पावलं उचलली जातील, असे आश्वासन महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.


व्हिडीओ पाहा



दरम्यान, बेळगाव दौऱ्यावर आलेले निजद नेते आणि माजी मंत्री बसवराज होरट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हे तर उपदव्यापी ठाकरे अशी टीका कर्नाटकचे माजी मंत्री आणि निजद नेते बसवराज होरट्टी यांनी केली आहे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असेही होरट्टी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.


शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा इशारा


महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे. असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला दिला आहे. तसेच, या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचंही धैर्यशील मानेंनी म्हटलं आहे. तसेच या विकृत संघटनेवर बंदीची घालण्याचीही मागणी धैर्यशील माने यांनी केली आहे.


पाहा काय म्हणाले धैर्यशील माने?