बेळगाव : प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor Trolly) नदीत उलटल्याची (River) मोठी दुर्घटना बेळगावमध्ये घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील आवरादी गावाजवळ 13 जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर घटप्रभा नदीत उलटला आहे. यापैकी बारा जण बचावले असून एक जण पाण्यातून वाहून गेला. ट्रॅक्टरमधून 13 जण आवरादी येथून नांदगाव येथे मजुरीसाठी निघाले होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून 13 जण प्रवास करत होते. घटप्रभा नदी ओलांडून दररोज हे मजूर कामावर जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.


13 जणांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली नदीत उलटली


प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली घटप्रभा नदीत उलटली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु केलं आहे. पोलिसांनी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या दुर्घटनेतील 12 जण बचावल्याची माहिती असून एक जण अद्यापही बेपत्ता आहे. या बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरु आहे. प्रशासन बचावकार्यात गुंतलेलं आहे. कुलगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.


बेळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी


दरम्यान, बेळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बेळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे. पावसामुळे अनेक भागात घरात आणि दुकानात पाणी शिरले. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे गुरुवारी रात्री ढगफुटी होऊन पाऊस झाल्याने श्री यल्लमा देवीच्या मंदिरात देखील पाणी शिरले.