बीड : वाहन चालवताना तुम्ही जर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं, तर तुम्हाला जो दंड भरावा लागतो, तो आता तुम्हाला थेट तुमच्या एटीम कार्ड द्वारे भारता येणार आहे. बीडमधील वाहतूक पोलिसांकडे दंड वसुलीसाठी स्वाईप मशिन


नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांरोबरच बरोबरच पोलीस खात्याला देखील बसला आहे. मात्र, बीडच्या वाहतूक पोलिसांनी कॅशलेस पद्धतीचा अवलंब करत यावर उपाय शोधून काढला आहे.

वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून आता या स्वाईप मशिनद्वारे दंड वसूल करण्यात येणार आहे. अनेक वाहनचालक चलनात नसलेल्या जुन्या नोटा पोलिसांना दंड म्हणून देण्याचा प्रयत्न करायचे, तर कधी सुट्टे नसल्याचे कारण पुढ करून दंड चुकवायचे. मात्र, आता स्वाईप मशिन आल्यामुळे दंडाची रक्कम रोख न देता ती एटीएम कार्ड स्वाईप करुन भारता येणार आहे.

अगदी छोट्या-छोट्या दंडासाठी वाहनचालक पोलिसांना दोन हजाराची नोट दाखवतात आणि पोलिसांकडे सुट्टे पैसे देण्यासाठी नसतात. यावरुन कधी-कधी वाद देखील होतात. मात्र, आता या कॅशलेस प्रणालीमुळे पोलिसांची दंडात्मक कार्यवाही अधिक पारदर्शक होणार आहे.

पोलिसांकडे आता स्वाईप मशिन आल्यामुळे रोख रकमेतून होणारे व्यवहार बंद होतील आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होणार आहे.

पोलिसांच्या या कॅशलेस उपक्रमामुळे वाहनचालक देखील समाधानी आहेत. कारण त्यांना जो दंड आकारण्यात येणार आहे, ती रक्कम पोलिसांच्या खिशात न जाता त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे पोलिसात आणि वाहनचालकात वादावादी होणार नाही आणि प्रत्यकाला दंड भरणे सोपे होईल.