बीड : बीड पोलिस दलातील महिला शिपाई ललिता साळवेला लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी अखेर परवानगी मिळाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ललिताला शस्त्रक्रियेच्या परवानगीचं पत्र दिलं आहे. त्यामुळे लिंगबदल शस्त्रक्रियेनंतरही ती पोलिस दलात कायम राहू शकणार आहे.

बीड पोलिस दलात 2010 मध्ये भरती झालेल्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेने, पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे लिंगबदल करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. ललिता पोलिस दलात महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली खरी पण, त्यांनतर शरीरात महिलेपेक्षा वेगळे बदल तिला जाणवू लागले. त्यामुळे तिने जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांना सप्टेंबर 2017 मध्ये अर्ज करुन, आपणास पुरुष होण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज केला.

मात्र हा विषय जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने त्यांनी ललिताचा अर्ज राज्याचे पोलिस महासंचालकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला होता. पण पोलिस महासंचालकांनी लिंग बदल करुन पोलिस दलातील नोकरी कायम ठेवण्याची तिची मागणी फेटाळली होती. तर मुख्यमंत्र्यांनी या दुर्मिळ केससंदर्भात सहानुभूतीने विचार व्हावा, असा आदेश दिला होता.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनंतर गृहखात्याने याप्रकरणी कायदेशीर मतं मागवली. ललिता साळवे शरीरातील जैविक बदलांशी सामना करत आहे. ही नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगला जाणं आवश्यक आहे. विशेष केस म्हणून तिच्या मागणीला परवानगी दिली जात आहे. त्यामुळे लिंगबदलानंतरही ललिता पुढील काळात नोकरीत कायम राहू शकेल, अशा आशयाचं पत्र पोलिस अधीक्षकांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या

ललिता म्हणून जन्मले, ललितकुमार म्हणून जगायचं आहे


'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश


लिंगबदलानंतरही नोकरीत कायम ठेवा, महिला पोलिस कॉन्स्टेबल हायकोर्टात


बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी

‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा सहानुभूतीपूर्वक विचार करा : मुख्यमंत्री