Beed News Update : ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शिक्षण सुरू राहावं म्हणून स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासनाकडून हंगामी वसतिगृह चालवले जातात. या वसतिगृहात मुलांच्या दोन वेळच्या जेवणासाठी शासनाकडून फक्त 33 रुपये दिले जातात. त्यामुळे आता 33 रुपयांमध्ये या मुलांना जेवण द्यायचं कसं असा प्रश्न वसतिगृह चालकांकडून उपस्थित केला जात आहे. 


बीडच्या केज तालुक्यातील नागझरी गावात ऊसतोड मजुरांच्या मुलांची शाळा आणि वसतिगृह आहे. या वसतिगृहात ऊसतोड कामगारांची 121 मुलं राहतात. इथील प्रत्येक मुलाला दोन वेळच्या जेवणासाठी शासनाकडून फक्त 33 रुपये मिळतायत. शासन एकीकडे शिवभोजन थाळीसाठी 60 रुपये मोजतं, मात्र ऊसतोड कामगारांच्या या मुलांसाठी दोन वेळच्या जेवणासाठी 33 रुपये देतं. 33 रूपयांमध्ये दोन वेळेचे जेवण कसं द्यायचं? असा प्रश्न वसतिगृह चालकांपुढे आहे.  


अनुदानात घट; 47 रूपयांवरून 33 रूपये 


दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे मुलांच्या जेवणाच्या पैशांमध्ये वाढ करण्याऐवजी त्यामध्ये कपात करण्यात आलीय. दोन वर्षांपूर्वी याच मुलांच्या जेवनासाठी 47 रुपये मिळायचे. मात्र त्यामध्ये कपात करून आता फक्त 33 रुपये दिले जातात. या 33 रुपयांमध्ये चपाती, भाकरी, वरण, भात, भाजी आणि रविवारी गोड पदार्थ या विद्यार्थ्यांना द्यावं लागतं. आई-वडिलांसोबत ऊस तोडणीला जाऊन त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या मुलांसाठी ही हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. मात्र यामध्येही त्यांची फरफटच होताना पाहायला मिळत आहे, अशी खंत वसतिगृह चालक गोकुळ सारूक आणि गंगुबाई चौरे यांनी व्यक्त केली. 


बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या 23 हजार मुलांसाठी 236 हंगामी वसतिगृह उभारण्यात आली आहेत. याच वसतिगृहात राहून ही मुलं शिक्षण घेत आहेत. नोव्हेंबर महिन्यात हे हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले होते. मात्र आता पाच महिने झाले तरीही वसतिगृह चालकांना याचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. त्यामुळे स्वखर्चातूनच ही वसतिगृह सध्या सुरू असून त्यातही विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण द्यावे लागत आहे. 


मुलांच्या जेवणासाठी अतिशय कमी पैसे मिळत असल्याने दरवर्षी हंगामी वसतिगृहांची संख्या कमी होत आहे. तर दुसरीकडे अद्यापही या वसतिगृहाला शासनाकडून पैसे मिळाले नसल्याने अनेक वसतिगृह बंद होण्याच्या मार्गावर आहेत. वाढत्या महागाईमुळे जिथे घर चालवणं मुश्किल झालंय तिथे वसतिगृह किती दिवस टिकणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 


महत्वाच्या बातम्या