Beed News Update : मुस्लिम हे भारतात हक्कदार नसून आश्रित आहेत, असं वक्तव्य मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan ) यांनी केलय. गेल्या काही दिवसापूर्वी गुजरातमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मुस्लिम हे भारतात किरायदार नसून हक्कदार असल्याचं म्हटलं होतं. ओवैसी यांच्या या वक्तव्यावरून प्रकाश महाजन यांनी ओवैसी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
प्रकाश महाजन म्हणाले, "त्या काळातील राज्यकर्त्यांनी सहिष्णुतेचे धोरण अवलंबून मुस्लिमांना भारतात ठेवलं ही त्यांची चूक झाली का? असं आता वाटतं. त्यांच्यावर दया करून त्यांना येथे ठेवलं. पण ते आता या घराचे मालक बनू पाहत आहेत. त्यामुळे ते हक्कदार कधीच होऊ शकत नाहीत ते आश्रित आहेत.
मुसलमान स्त्रियांनी देखील हिंदूशी लग्न केल्याचे दाखले
गुजरातमधील सभेत बोलताना ओवैसी यांनी म्हटलं होतं की, आमचा आणि मोगलांचा काही संबंध नसून मोगलांच्या राण्या हिंदू होत्या. यावर देखील महाजन यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, त्या काळातील राजपूत घराण्यांनी मोगलांशी रोटी आणि बेटीचा व्यवहार केला होता. त्यातून हिंदू ही खालची जात असल्याचं ओवैसी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसलमान स्त्रियांनी देखील हिंदूशी लग्न केल्याचे दाखले इतिहासात आहेत. अनेक राजांच्या राण्या या मुस्लिम होत्या.
सतीची प्रथा मुस्लिमांच्या अत्याचारामुळे सुरू झाली
भारतामध्ये राज्य करण्यासाठी ज्यावेळी मुस्लिम आले, त्यावेळी त्यांच्या एका हातात तलवार होती तर दुसर्या हातात धर्मग्रंथ होता. त्यांना भारतात इस्लाम राज्य स्थापन करायचं होतं. त्यामुळे त्यांनी हिंदूंचा नरसंहार करायला सुरुवात केली. अनेक महिलांवर त्यांनी अत्याचार केले. एवढेच नाही तर महिलांच्या मृतदेहावर देखील मुस्लिमांनी अत्याचार केले होते. त्यामुळे महिलांवर अत्याचार होऊ नयेत म्हणून आगीत आत्महत्या करायच्या आणि यालाच पुढे सती प्रथा नाव मिळालं. मेल्यावरही आपल्यावर अत्याचार होऊ नयेत त्यामुळे मोगलांच्या भीतीने हिंदू महिला पतीच्या चितेवरचं आत्महत्या करत असत.
औरंगजेबाची कबर तिथेच राहिली पाहिजे
भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे पाहुणे म्हणून पाकिस्तानात गेले होते. त्यावेळी त्यांना बॅरिस्टर जिनाची कबर दाखवली. त्यात काहीच वाईट नव्हतं. मात्र काही लोक हिंदूंना खीजवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीवर मुद्दामहून जातात. कबरीवर न जाण्यासाठी कायदा करण्याची काही आवश्यकता नसून मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतिक असलेली औरंगजेबाची कबर तिथेच राहिली पाहिजे, असे प्रकाश माहजान यांनी म्हटले आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं हे इतिहासकारांनी मान्य केलय
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं, हे इतिहासकार इरफान हबीब यांनी देखील मान्य केलं आहे. त्या ठिकाणचे मंदिर औरंगजेबानं पाडल्याचे दाखले त्यांनी दिले आहेत. त्याच मशिदीत मूळ शिवलिंग असून त्या ठिकाणी मंदिर असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. त्या काळात हिंदुंनी भूतदया दाखवून मुस्लिमांना आश्रय दिला. त्यामुळे पूर्वी मंदिर पाडून बांधलेल्या मशिदी या मंदिरच आहेत.