बीड/औरंगाबाद : आपल्याला मुलगा झाला, मात्र हाती मुलगी दिली, असा आरोप खुद्द जन्मदात्या आई-वडिलांनीच केल्याने सगळीकडेच खळबळ उडाली. तब्बल 21 दिवसांनंतर या चिमुरडीला आपले आई-वडिल मिळाले आहेत. त्यासाठी ती याच आई-वडिलांची मुलगी आहे हे तिला सिद्ध करावं लागलं.

काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यातील वडवणीतील थिटे दाम्पत्याचा आरोप होता, की आपल्याला मुलगा जन्माला आला, मात्र हाती मुलगी देण्यात आली. 11 मे रोजी या बाळाने बीडच्या जिल्हा रुग्णालयात जन्म घेतला. त्या नंतर चार-पाच दिवस या बळावर उपचार झाले. नंतर मात्र या बाळाला इथल्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. इथे मात्र ही मुलगी असल्याची नोंद डॉक्टरांनी केली आणि मुलीच्या आई-वडिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कारण, जिल्हा रुग्णालयाच्या नोंदीमध्ये या बाळाची नोंद मुलगा अशी करण्यात आली होती.

पोलिसात तक्रार केल्यानंतर हे दाम्पत्य ही मुलगी आमची नाहीच, यावर ठाम होतं. या नंतर आईने या मुलीला दूध पाजणं बंद केलं. चिमुकलीला झालेलं इंफेक्शन वाढत होतं, म्हणून या मुलीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं. इकडे पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास कसून करत होते. त्यासाठी डीएनए घेण्यात आले आणि तब्बल 19 दिवसानंतर ही मुलगी राजू आणि छाया थिटे यांचीच असल्याचं डीएनए अहवालात उघड झालं.

मुलगी आपली असल्याची खात्री पटली, तरीही आई-वडिलांचा प्रतिसाद नाही

मुलगी आपलीच असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सुद्धा हे निर्दयी आई-वडिल एक दिवस पोलीस स्टेशनला पोहोचलेच नाहीत. अखेर बीड पोलिसांनी या आई-वडिलांना सोबत घेऊन घाटी रुग्णालय गाठलं आणि रितसर या मुलीचा ताबा आई-वडिलांना देण्यात आला.

जन्माच्या आठ दिवसांनंतरच आई-वडिलापासून दुरावलेली चिमुरडी आपल्या आईच्या कुशीत विसावली खरी, पण यासाठी तूच माझी आई आहेस हे सिद्ध करावं लागलं.

या बाळाचं इंफेक्शन आणखी कमी झालं नसल्याने आणखी काही दिवस या बाळावर घाटी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. इथून पुढचा या मुलीचा ताबा तिच्या आई-वडिलांकडे देण्याचे सोपस्कार पोलिसांनी रुग्णालयातच पार पाडले.

आपल्या आई-वडिलांपासून परक्या झालेल्या या 21 दिवसाच्या चिमुरडीला रुग्णालय प्रशासनाने मात्र मोठा जीव लावला.

बीडच्या जिल्हा रुग्णालयातील एका छोट्याशा चुकीमुळे कागदावर बाळाची अदलाबदल झालेलं हे प्रकरण जितकं चर्चेत राहिलं, त्यापेक्षाही मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास करणारे आई-वडिलही कायम लक्षात राहतील.

कागदावर मुलगा किंवा मुलगी हे तांत्रिक असले तरी जन्मदात्या मातेने आपल्या पोटी जन्माला आलेलं बाळ ओळखू नये हे निर्दयीच म्हणावं लागेल.

पाहा व्हिडीओ :