बीड: माजलगावच्या धरणात बुडालेल्या एका डॉक्टरचा शोध घेत असताना कोल्हापूर येथील केडीआरएफचे जवान राजशेखर मोरे पाण्यात खोल उतरले असता एका माशाच्या जाळ्यात ते अडकले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच राजशेखर मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी म्हणून माजलगावमध्ये मदत फेरी काढण्यात आली होती. यामध्ये 25 लाख रुपयांची मदत जमा झाली असून ती शहीद जवानाच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. 


माजलगाव येथील प्रसिद्ध असलेले डॉक्टर फपाळ हे माजलगावच्या धरणात पोहण्यासाठी गेले होते.धरणातल्या पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले आणि त्यानंतर त्यांचा स्थानिक मच्छीमार आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध सुरू झाला. 24 तास उलटले तरी देखील फपाळ यांचा मृतदेह सापडत नसल्याने कोल्हापूर येथून केडीआरएफच्या जवानांना प्रचार बोलवण्यात आलं होतं.


याच जवानांच्या तुकडीमध्ये राजशेखर मोरे यांचा देखील समावेश होता. शोध घेण्यासाठी राजशेखर मोरे आणि त्यांचे काही सहकारी बोटीच्या माध्यमातून धरणाच्या पाण्यात उतरले. त्यांच्या पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर देखील होते. मात्र खोल पाण्यात गेल्यावर मासे पकडण्यासाठी टाकलेल्या एका जाळ्यात राजशेखर मोरे अडकले आणि तिथेच घात झाला. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत त्यांचं ऑक्सिजन सिलेंडर त्यांच्यापासून बाजूला झालं आणि ते जाळ्यात जास्तच अडकले गेले. त्यांच्या सहकारी जवान त्यांना पाण्यातून बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते आणि शेवटी काही तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. मात्र पाण्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला होता.


कोल्हापूरहून माजलगाव मध्ये बचावकार्यासाठी आलेले राजशेखर मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यानंतर माजलगाव मध्ये राजशेखर मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी यासाठी माजलगाव पत्रकार संघ रोटरी क्लब व्यापारी महासंघ आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मदत फेरीच आयोजन करण्यात आलं होतं. यात माजलगावकरांनी दातृत्व दाखवून सढळ हाताने राजशेखर मोरे यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत केली आहे.


देशात किंवा राज्यात कुठेही आपत्ती आली तर राजशेखर मोरे यांच्यासारखे जवान आपल्या प्राणाची बाजी लावून बचाव कार्य करत असतात. कोल्हापूरहून आलेल्या मोरे यांना माजलगावात वीरमरण आलं. त्यांनी दिलेलं बलिदान माजलगावकर कधीही विसरणार नाहीत त्यामुळे माणुसकीच्या नात्याने त्यांच्या कुटुंबासाठी माजलगावकरांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल.