Uddhav Thackeray Slams BJP :मुंबई महानगरपालिका निवडणूकीपूर्वी (BMC Election) शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना संबोधित करत गटप्रमुख मेळावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप तसंच शिंदे गटावर टीकास्त्रही सोडलं. यावेळी बोलताना त्यांनी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असणाऱ्या चित्त्यांबद्दल देखील वक्तव्य केलं. ''चित्ते भारतात आणले याचं कौतुकच आहे, आम्ही पेंग्विन आणले होते. पण आम्ही कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी करुन नाटकं केली नाहीत.'' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टोलाही लगावला. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी एकप्रकारे रणशिंग फुंकलं असून आज त्यांनी गोरेगावच्या नेस्को मैदान येथे गटप्रमुखांच्या मेळावा घेतला. यावेळी विविध मुद्द्यांना हात घालताना उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या चित्त्यांबाबतही आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी चित्त्याची डरकाळी अशी चर्चा सुरु होती, पण चित्ते मांजरीप्रमाणे आवाज करतात असं म्हणत चित्ते आणल्याचं कौतुकच आहे, पण हे करताना केलेली नाटकबाजी योग्य नाही असं म्हटलं आहे. तसंच आम्ही मुंबईत पेंग्विन आणले याचा आम्हाला अभिमानच आहे. पण आम्ही नाटकं करत फोटोग्राफी केली नाही, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे एक उत्तम फोटोग्राफर असल्याने 'फोटोग्राफी माझा विषय असूनही, आम्ही पेंग्विन आणल्यावर नाटकं केली नाहीत' असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.


'दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार'


यावेळी बोलताना शिवसेनेचा शाण असलेला दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. मागील  महिन्याभरापासून  शिवसेनेच्या अर्जावर मुंबई महापालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे बीकेसी मैदान शिंदे गटारकडून निश्चित करण्यात आल्याने उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य होते. त्यांनी आता यावर स्पष्ट भाष्य करताना शिवतीर्थावरच होणार असल्याचे ठणकावून सांगितले. पुढे बोलताना उद्धव यांनी भाजपवर जहरी टीका केली. ते म्हणाले की, "मुंबईवर आज गिधाडं फिरत आहेत. निवडणुका आल्यावरच यांना मुंबईची आठवण येते. अमित शाह हे त्यापैकीच एक. शिवसेनेला त्यांनी आस्मान दाखवणार असल्याचं सांगितलं. पण आम्ही त्यांना आस्मान दाखवणार आहोत. ही शिवसेना मराठी माणसाच्या बलिदानातून मिळाली आहे. यांना ही हातात घेऊन विकायची आहे." शिवसेना म्हणजे विश्वास आहे, एक आधार आहे, म्हणून शिवसेनेवर मुंबईकर विश्वास ठेवतात. मुंबईवर ज्या ज्या वेळी संकटं आली त्या त्या वेळी शिवसैनिक धावून गेले होते असंही ते म्हणाले. 


हे देखील वाचा-