बीड : कोरोना रुग्णांचा वाढता आकडा प्रशासनापुढे मोठी आव्हानं उभी करत आहे. आता कुठं अर्थचक्राला गती मिळत असतानाच कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आणि परिस्थिती आणखी चिघळली. ज्यामुळं स्थानिक प्रशासनाने काही कठोर निर्बंध लागू करत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. काही भागांत तर कडक लॉकडाऊनचेही निर्देश देण्यात आले. पण, सर्वसामान्य जनतेत मात्र याबाबत दहशतीचं वातावरण दिसून आलं. 


बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही अशा परिस्थितीला सामोरं जात नागरिकांच्या मागण्यांचा विचार करावा लागला आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन मध्ये वाढीव सूट देण्याबाबत त्यांनी घोषणा केली असून, जिल्हावासीयांच्या मागणीनुसार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यासह सर्व प्रकारच्या व्यापारास परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना त्यांनी निर्देश दिले आहेत. 


बीडमध्ये 26 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळांमध्ये शिथीलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिक, तसंच काही पत्रकारांनी मागणी केली होती. धनंजय मुंडे हे स्वतः सध्या कोविड पॉझिटिव्ह असून, मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. असं असलं तरीही त्यांनी कामासही तितकंच प्राधान्य दिलं आहे. 


उद्धवजी अडचण अशी आहे की... ; आनंद महिंद्रांकडून लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला 


जिल्ह्यातील नागरिकांनी तसंच विविध व्यापारी संघटनांनी विविध मार्गांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे लॉकडाऊन मध्ये शिथिलता देऊन व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत मागणी केली होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना, हातावर पोट असणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना उद्या (दि. 30) मंगळवारपासून लॉकडाऊन मध्ये सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या व्यवसायांना मुभा देण्याबाबत निर्देश दिले आहेत. असं असलं तरीही या वेळांत कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावं असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी केलं आहे.