बीड : हल्ली आरोग्यांच्या समस्या चांगल्याच वाढल्या आहेत. तरुणांनाही अनेक आजार जडत आहे. चुकीची जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव यामुळे तरुण ऐन उमेदीच्या वयात वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. विशेष म्हणजे या आजारांमुळे काही तरुणांना आपला जीवदेखील गमवावा लागत आहे. बीड जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. याघटनेत एका 24 वर्षाच्या तरुण मुलाला परीक्षा देत असताना हृदयविकाराचा झटका आला आहे. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


परीक्षा देत असतानाच हृदयविकाराचा झटका


मिळालेल्या माहितीनुसार बीडमध्ये परीक्षा देत असताना एका 24 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धार्थ मासाळ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पदवीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देत होता. के एस के महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 


रक्तपुरवठा करणाऱ्या नसांत गाठी


या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये गाठी तयार झाल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. 


परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीत राहायचा


दरम्यान सिद्धार्थ मासाळ भूम तालुक्यातील डुक्करवाडी येथील रहिवासी असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दिल्लीला राहत असे.परीक्षा देण्यासाठी तो बीडमध्ये आला होता. मात्र परीक्षा देतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कमी वयात  हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तरुणांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. 


क्रिकेट खेळत असताना कार्डियाक अरेस्ट


काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. 35 वर्षीय इम्रान पटेल या तरुणाचा क्रिकेट खेळत असतानाच मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याला कार्डियाक अरेस्ट आला होता. त्यामुळे मैदानावरच त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. छत्रपती संभाजीनगरातील या क्रिकेटच्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होत होते. त्यामुळे त्याच्यासोबत घडलेला हा दुर्दैवी प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या तरुणाच्या छातीत दुखत होते. त्याने अम्पायरला त्याबाबत माहिती दिली होती. मैदानातून बाहेर जात असतानाच तो थेट कोसळला होता. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.


हेही वाचा :


मोठी बातमी! अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीची यादी ठरली, कोणला मिळणार संधी? 


Health: चहासोबत सिगारेट ओढण्याची सवय चांगलीच पडेल महागात! हृदयविकार, कर्करोगाचा धोका आणि बरंच काही...


Health: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? सावधान! कर्करोग, हृदयविकार अन् रक्तदाबाला आमंत्रण, संशोधनातून समोर