Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील जोतिर्लिंग आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर उडवून देण्याचं धमकी पत्र बीड पोलिसांना मिळालं. ज्यात मंदिर व्यवस्थापणास पन्नास लाख रुपयांची खंडणी द्या, अथवा मंदिर आरडीएक्सनं उडवून देऊ या आशयाचं पत्र नांदेड येथील विष्णुपुरी येथील रहिवाशी रातनसिंग दक्खने, व्यंकट गुरपत मठपती आणि प्रभाकर पुंड यांच्या नावानं मंदिरास आले होते.
पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. पण तपासाअंती धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड येथील सिडको परिसरातील शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक असणाऱ्या नंदकुमार डिगांबर बालुरे या शिक्षकानं उदगीर येथील त्यांची जमीन विष्णुपुरी येथील रहिवासी रतनसिंह रामसिंह दक्खने यांना विकली होती. पण याच शेतीच्या आणि पैशाच्या वादातून दोघांचे नंतर खटके उडाले. या प्रकरणावरुन दोघांमध्ये वितुष्ट आले. सदर वाद न्यायालयात पोहचला. पण या वादातून रतनसिंह यांना त्रास देण्यास बालुरे गुरुजींनी सुरुवात केली. ज्यात कोणाचाही मृत्यू झाला, अथवा आत्महत्या झाली, तर त्यात रातनसिंह यांचं नाव घेऊन पत्र व्यवहार करण्याचा सपाटा नंदकुमार बालुरे गुरुजींनी लावला.
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस, नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय, आयजी ऑफिस नांदेड, मांडवी,किनवट पोलीस, परळी वैजनाथ मंदिर, अंबाजोगाई मंदिरास पत्र व्यवहार केल्याचं उघड झालं आहे. तर 20 नोव्हेंबर 2021 नंतर प्रभाकर पुंड यांच्या नावे नगर येथील आमदार गिरीष महाजन यांना नऊ कोटींचा भ्रष्टाचार उघड करतो, असं पत्र देण्यात आलं. तर दुसरं पत्र थेट अण्णा हजारे यांना अर्वाच्य भाषा वापरून करण्यात आलं होतं. त्यामुळे या तीन जणांना आतापर्यंत तीस ते चाळीस पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे या तिघांना आणि त्यांच्या कुंटुंबियांना मोठ्या मानसिक त्रासास सामोरं जावं लागत आहे. तर सदरच्या पत्रातील अक्षर आणि पत्र हे नंदकुमार बालुरे यांचं नसल्याचा निर्वाळा बालुरे यांच्या शाळेनं केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिराला आरडीएक्सनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्यानं परळीमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आहे. वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आहेत. 50 लाख रुपये द्या, अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देवू, असं धमकी देणारं पत्र मुख्य विश्वस्तांच्या नावानं आलं आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना एक पत्र मिळालं आहे. पत्रामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या, अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देऊ, असा मजकूर लिहलेला आहे.
मंदिराचे सचिव हे पत्र मंदिर सचिव देशमुख यांनी परळी शहर पोलिसांकडे दिलं आहे. मंदिराला असं धमकीचं पत्र पहिल्यांदाच आलं असं राजेश देशमुख यांनी सांगून यांच्या चौकशीची मागणी शासनाकडे केली आहे. 20 वर्षांपूर्वी मंदिर उडवण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली होती. त्यानंतर या मंदिरात एस.पी. बीडने एक चारचा पोलीस गार्ड दिलेला आहे. शुक्रवारी आलेलं पत्र कोणी पाठविलं? का पाठविलं? याची चौकशी व्हायला हवी, कडक पोलीस सुरक्षा द्यावी, अशी मागणी राजेश देशमख यांनी एका पत्राद्वारे पोलीसांकडे केली होती. या प्रकरणाची चौकशी चालू आहे. गुन्ह्याची नोंद परळी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.