Beed News Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे तहसील कार्यालयातील कर्मचारी काम करतात. परंतु, काँग्रेस कार्यकर्त्यांचे काम करत नाहीत, असा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार यांच्या अंगावर बेशरमाची झाडे टाकून आंदोलन केले. मात्र, हे आंदोलन काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या आंदोलनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना जेलची हवा खावी लागली आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


परळी शहरातील 1557 रेशन कार्डधारकांची डाटा एन्ट्री करून त्यांना त्वरित रेशन वितरीत करा, या मागणीसाठी परळीत काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार यांना बेशरमाचे झाड देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय तहसीलदारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर बेशरमाची झाडे टाकण्यात आली.   


काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आंदोलनामुळे परळी तहसील कार्यालयामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही  बाब महसूल कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घेत या आंदोलनानंतर परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून  आंदोलनकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला. या सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  


काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये परळीत संघर्ष


राज्यात महा विकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित सत्तेत असतानाही बीड जिल्ह्यात मात्र, राष्ट्रवादीचा शिवसेनेसोबत संघर्ष सुरू होता. आता बीडमध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत  आहे. रेशन कार्डच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे सय्यद हनिफ उर्फ बहादुर यांनी परळीच्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर  बेशरमाची झाडे टाकून आंदोलन केले. याप्रकरणी काँग्रेस शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात परळी तहसील समोर ठिय्या आंदोलन केले. 


सय्यद हनीफ सय्यद करीम, प्रकाशराव देशमुख, गणपतअप्पा कोरे, सुभाष देशमुख, शिवाजी देशमुख, शेख बद्दर, रंजीत देशमुख, सय्यद मसूद, शेख सिकंदर, सय्यद अमजद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


महत्वाच्या बातम्या 


Beed: अंगावर कुत्रा सोडल्यानं महिला जखमी, मालकाविरोधात गुन्हा दाखल, बीड येथील घटना


1600 किलोमीटर पाठलाग करून बीड पोलिसांनी कुख्यात चैन चोरांच्या मुसक्या आवळल्या