बीड: संकटांनो, तुमची लायकी नाही, मी तुम्हाला शरण यायला असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून बोलताना म्हणाल्या. आपल्याला काय मिळेल आणि काय नाही याची चिंता मी कधीही केली नाही असंही त्या म्हणाल्या. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्ताने गोपीनाथ गडावर आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.


राज्य सरकारने शिवराज सिंह चौहानांचे अनुकरण करावं
भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, "राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौहान यांचे अनुकरण करावं आणि ओबीसींना न्याय द्यावा. मध्य प्रदेशच्या सरकारने ज्या पद्धतीने ओबीसींना आरक्षण दिलं आहे त्याच धरतीवर राज्य सरकारनेही ओबीसींना आरक्षण द्यावं"


पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मुंडे साहेबांना आपल्यातून जाऊन 8 वर्षे झाली. आजच्याच दिवशी आठ वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेत आलं. त्यावेळी गोपीनाथ मुंडेंचा सत्कार याच गडावर होणार होता, इथला प्रत्येकजण त्यासाठी उत्सुक होता.  सूर्योदय जर कोणी काळा असतो का असं विचारलं तर मी सांगेन 3 जून हा काळा दिवस आहे. आजच्याच दिवशी मुंडेसाहेब आपल्यातून गेले. मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार असा सवाल होता. त्यासाठी मी गोपीनाथ गडाची निर्मिती केली."


पराभवाचं सोनं केलं
पंकजा मुडे म्हणाल्या की, माझा जो पराभव झाला त्यातून मी खूप काही शिकले. पराभवामुळेच मी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. मी पराभवाचं सोनं केलं. 


गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू
3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात परत येण्यासाठी 3 जून रोजी सकाळी आपल्या गाडीतून दिल्ली विमानतळावर जात असताना गाडीचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना त्वरीत एम्समध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली होती.