Beed Accident : अंबाजोगाई मध्ये मध्यरात्री एक भीषण अपघात (car accident) झाला असून रस्त्यावरून जाणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने इतकी जोरात धडक दिली की ती कार 15 फूट फरफटत गेली..या अपघातात निलेश पवार या तरुणाचा जागीच मृत्यु झाला असून अपघातानंतर या कारचे चारही टायर वर झाले होते.. जोराच्या धडकेनंतर ही आडवी कार चक्क रस्त्याच्या कडेला उभी झाली होती तर रस्त्याच्या कडेला नालीच्या अर्धवट तारा उघड्या होत्या. या तारा कारमध्ये घुसल्या होत्या.


एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने शोककळा


अंबाजोगाईच्या मोरेवाडी परिसरातील निलेश पवार हा रात्री साडेबारा वाजता लातूरच्या दिशेने निघाला होता. मात्र त्यावेळी पाण्याच्या टाकी परिसरामध्ये त्याच्या गाडीला विचित्र अपघात झाला. या अपघातात निलेशचा जागीच मृत्यू झाला. निलेश हा एकुलता एक होता. कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे या अपघातानंतर आता मोरेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. निलेशचा कार भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. रात्री तो कारमध्ये डिझेल भरून यशवंतराव चव्हाण चौकाकडून घराकडे निघाला होता. त्याची गाडी पाण्याच्या टाकीजवळ आली असता रखडलेल्या महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना त्याची कार रस्त्याच्या खाली उतरली आणि लोखंडी गज उघडे असलेल्या नालीत कोसळली. या अपघातात निलेश गंभीर जखमी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. निलेश हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. निलेश हा घरातील कर्ता तरुण पुरुष असल्याने त्याच्यावरच कुटुंबाचा भार होता. त्याच्या अपघाती मृत्यूने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


नागरिक संतप्त


मागील चार वर्षापासून अंबाजोगाईच्या आजूबाजूला विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. अतिशय संथ गतीने ही कामे सुरु असून या कामांची मूळ मुदत केंव्हाच संपली आहे. यापूर्वी पिंपळा-धायगुडा ते अंबाजोगाई या रखडलेल्या कामाने अनेकांचे बळी घेतले. अजूनही हा मार्ग पूर्ण झालेला नाही. हीच गत आता भगवानबाबा चौक ते पाण्याची टाकी पर्यंतच्या रस्त्याची आहे. अनेक निवेदने, आंदोलने केल्यानंतरही याची दखल न घेतल्याने नागरिक आता संतप्त झाले आहेत.


गुन्हे दाखल करण्याची मागणी


रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास आहे. धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे, तर खराब रस्त्यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जात आहे. याला कारणीभूत असलेला गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



ST Strike: एसटी संपावर पुढील सुनावणी शुक्रवारी; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं राज्य सरकारचे आवाहन