मुंबई : कैद्यांनी बनवलेल्या बेडशीट्स आता रेल्वेमध्ये वापरण्यात येणार आहेत. सेंट्रल रेल्वेकडून (Central Railway) याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य कारागृह विभाग आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने या बेडशीट्स रेल्वेला पुरवल्या जाणार आहेत. येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या बेडशीट्स राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम क्लासच्या एसी कोचमध्ये 15 ऑगस्टपासून पुरविल्या जातील, अशी माहिती सेंट्रल रेल्वेने दिली आहे.
कैद्यांनी बनवलेल्या बेडशीट्स आता रेल्वेमध्ये वापरण्यात येणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने ट्विरच्या माध्यमातून दिली आहे. देशातील प्रत्येक जेलमध्ये कैद्यांना विविध कामे दिली जातात. आपापल्या आवडीनुसार कैदी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवत असतात. गुन्हेगारांना समाजापासून वेगळे ठेवून समाजाचे रक्षण करावे आणि गुन्हेगारांना सुधारण्याची संधी द्यावी, तसेच त्यांच्या हातून घडलेल्या गुन्ह्यांबद्दल त्यांना उत्पादक कामात गुंतवावे या हेतुने त्यांना विविध प्रकारची कामे दिली जातात. त्याचप्रमाणे पुण्यातील येरवडा कारागृहातील कैदी बेडशीट्स बनवतात. कैद्यांनी बनवलेली हीच बेडशीट्स यापुढे रेल्वेत वापरण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे रेल्वेत चादर, ब्लँकेट देण्याची सुविधा बंद करण्यात आली होती. परंतु, 10 मार्चपासून ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन-अडीत वर्षांपासून ट्रेनमध्ये चादर, ब्लँकेट देण्याची सुविधा बंद केली होती. परंतु, मार्च पासून ही सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने मार्चमध्ये ट्रेनमध्ये चादर, ब्लँकेट आणि पडदे देण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी केला होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर या सुविधेवर बंदी घालण्यात आली होती.