अमरावती : ही बातमी वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला रेल्वेत दिलं जाणारं अन्न खावंसं वाटणार नाही. कारण या प्रवासात तुम्ही जे खाद्य मागवता, ते कसं बनवलं जातं, याचं एक उदाहरण समोर आलं आहे. सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे स्थानकावरील हा व्हिडीओ आहे. रेल्वे प्रवासात तुम्ही वडापाव, कटलेट, पॅटिस असे स्वस्त आणि झटपट मिळणारे पदार्थ खात असाल तर सावधान व्हा.. कारण या पदार्थांसाठीचे शिजवलेले बटाटे पायाने तुडवले जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

धामणगाव स्टेशनवर काल रात्री अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मंगेश भुजबळ आणि पवन शर्मा या स्थानिक पत्रकारांनी हा व्हिडीओ काढल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही, तर या दोघांनी ट्वीट करत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही याबाबत तक्रार केली आहे.

रेल्वेतील सर्वच पदार्थ अशा प्रकारे बनवले जातात असं म्हणता येणार नाही. मात्र या घटनेने प्रवाशांच्या मनात भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन प्रवाशांना विश्वास देणं गरजेचं आहे.

व्हिडीओ :