सोलापूर : सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका सामाजिक कार्यकर्त्याने विष प्राशन केलं. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्यासमोर हा प्रकार घडला. बेकायदा कामकाज रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा निषेध करत बशीर जहागीरदार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.


टेंभुर्णी गावात बांधलेलं सभागृह खुल करावं अशी त्यांची मागणी आहे. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या सभागृहावर आमदार पुत्राने ताबा घेतला आहे. या सार्वजनिक सभागृहात राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी विठ्ठल बाजार स्थापन केला आहे.

वास्तविक पाहता गावातल्या लोकांना सार्वजनिक उपक्रमासाठी हे सभागृह बांधण्यात आला होत. पण शिंदे यांनी आपल्या समर्थकांना किराणा दुकान चालवण्यासाठी या सभागृहात विठ्ठल बाजार सुरु केला. याविरोधात बशीर जहागीरदार लढत आहेत.

जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. 30 सप्टेंबर पर्यंत हे सभागृह खुल करून द्यावं, अशी त्यांची मागणी होती. पण राजकीय दबावाला बळी पडून प्रशासन कारवाई करत नव्हतं. याविरोधात आवाज उठवत कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा गेल्या महिन्यात बशीर जहागीरदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. आज जिल्हधिकारी कार्यालयात बशीर यांनी विष प्राशन केलं.

बशीर जहागीरदार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपाचार सुरु आहेत. टेंभुर्णीमधील बेकायदा व्यापारी गाळ्यांचा विरोधातही त्यांनी जबरदस्त लढा दिला होता. प्रस्थापितांनी मनगटाचा वापर करून बळकावलेले व्यापारी गाळे न्यायालयीन लढाई लढून शासनाला मिळवून दिले होते. त्यांच्या लढ्याची दखल घेऊन 16 मे 2016 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी बेकायदा व्यापारी गाळे जमीनदोस्त केले होते.

आता सार्वजनिक सभागृह खुले करण्यासाठी लढणाऱ्या बशीर जहागीरदार याना प्रशासकीय अनास्थेमुळे आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.