Maharashtra Mumbai News : फेलोशिपसाठी मागील 51 दिवसांपासून मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. सरसकट 861 विद्यार्थ्यांच्या फेलोशिपची (fellowship) मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सामाजिक न्याय सचिव याची विद्यार्थ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सर्व संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शरद पवारांनी घातलं होतं लक्ष
बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तथा 'बार्टी' (BARTI Student) ने पात्र ठवलेल्या अनुसूचित जातीमधील 861 संशोधक विद्यार्थ्याच्या फेलोशिपसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला यश आलं आहे. फेलोशिप देण्याच्या संदर्भातील निर्णयानंतर विद्यार्थ्यांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष कृती समितीने आनंद व्यक्त केला. विविध पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या आंदोलनात लक्ष घातल्यामुळं राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेत काल (12 एप्रिल) बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणासाठी सन 1913 मध्ये न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाचा प्रवास केला होता. या ऐतिहासिक प्रवासाला 2013 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ बार्टीने युजीसी आणि परदेशात पीएचडी व एमफिल करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरु केली होती. 2021 मध्ये या विद्यर्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या 200 इतकी वाढवण्यात आली. तर पीएचडी ऐवजी एमफिलसाठी पाच वर्षासाठी हे स्वरुप निश्चित करण्यात आले होते. यात एमए करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 35 हजार रुपये तसेच प्रवास भत्ता असे प्रति महिना एकूण 40 हजार रुपये पाच वर्षांसाही देण्यात येतात. 2021 मध्ये सामाजिक न्याय विभागाने 200 विद्यार्थ्यांना विविध विषयांवर फेलोशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज मागविले होते. यावेळी राज्यातून यावेळी 1035 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी मुलाखतीच्या माध्यमातून 862 विद्यार्थ्यांपैकी 200 विदयार्थ्यांच्या निवडीस बार्टीने मान्यता दिली होती.
आंदोलनाला विविध राजकीय संघटनांचा पाठिंबा
दरम्यान, बार्टीने सरसकट 862 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मागील 51 दिवसांपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात भीम आर्मी, भारतीय लोकसत्ताक संघटना, इसरा यांच्यासह आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेनेही पाठिंबा दिला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करावं
दरम्यान, संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सरकारी स्तरावरील चक्रे वेगाने फिरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करुन तुमचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन शरद पवार यांनी भेटायला आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिले होते. पवारांच्या मध्यस्थीची तसेच आंदोलकांचा रेटा आणि वाढता पाठिंबा पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला सह्याद्री विश्रांतीगृह येथे चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भागे हे देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर 200 ऐवजी सरसकट 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला. मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षीपासून बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीनं पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या: