सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजून मोठा झटका बसण्याची दाट शक्यता आहे. कारण, माजी पाणीपुरवठामंत्री आणि बार्शी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण, उमेदवार निवड प्रक्रियेत मुलाखतीला दांडी मारल्यानंतर सोपल यांनी पक्षाच्या बैठकीकडेही पाठ फिरवली आहे.


इतकंच नाही तर त्यांनी बार्शीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आठ दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सोपल यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे इगतपुरीच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित या देखील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गावित यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी निमंत्रण दिल्याचं समजतं आहे. गावित यांच्याकडून सध्या कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
बार्शी विधानसभा । बार्शी तिथं कुणाची व्हणार सरशी, 'साहेब' की 'भाऊ' कोण मारणार बाजी?
आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजावून घेणार असून आठ दिवसात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सोपल यांनी सांगितलं आहे. आधी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला आमदार दिलीप सोपल यांनी दांडी मारली होती. आता मुंबईच्या बैठकीला दांडी मारून आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला.

भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटप नुसार बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेचे शिवबंधन लवकरच हातात बांधणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्याने दिलीप सोपल यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 'निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांची भावना समजून घेणार आहे आणि लवकरच कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे जाहीर करणार' असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिलीप सोपल यांनी दिली.