बारामती : पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभेची परवानगी मागायला गेलेल्या एका सीआरपीएफच्या जवानाला बारामती पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीत जवानाचे कपडेदेखील फाटले आणि मोबाईलही फुटला आहे. या जवानासोबत आलेल्या माजी सैनिकालादेखील पोलिसांनी धक्काबुक्की केली.


जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे देशभर संतापाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

सीआरपीएफच्या 118 बटालियनमध्ये कार्यरत असलेले अशोक इंगवले हे बारामतीजवळच्या सोनगाव येथील रहिवासी आहेत. शहीदांसाठीच्या श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी इंगवले बारामती तालुका पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून मारहाण केली आहे.

दुचाकीवरुन पोलीस ठाण्यात ट्रीपल सीट का आलात? अशी विचारणा करत अशोक इंगवले या जवानाला पोलिसांनी खोलीत डांबून मारहाण केली आहे. विशेष म्हणजे इंगवले यांच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनादेखील पोलिसांनी धक्काबुक्की केली.

व्हिडीओ पाहा : VIDEO | सीआरपीएफ जवानाला पोलिसांची गंभीर मारहाण | बारामती | एबीपी माझा



या घटनेमुळे बारामती तालुका पोलीस ठाण्यात युवकांनी गर्दी केली आहे. दरम्यान याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासून वस्तुस्थितीनुसार कारवाई करु, असे आश्वासन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिले आहे.