Baramati Lok Sabha constituency : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा (Baramati Lok Sabha constituency) शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची स्थिती संदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतला जात आहे. 


पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचा धडाका सुरु आहे. 16 ऑगस्टपासून हे बैठकांचे सत्र सुरु आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, भाजपविरोधी इंडिया आघाडीमध्ये आपण असल्यामुळं बारामतीत सुप्रिया सुळे यांना आपल्या पक्षाकडून ताकद द्या, त्यांना साथ द्या, अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद किती यासंदर्भात विधानसभानिहाय सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आपण कोणत्या विधानसभेच्या जागांसाठी विचार करु शकतो या संदर्भात सर्व नेत्यांना बैठकीत विचारणा करण्यात आली. 


खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी


दरम्यान, खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी अशी इच्छा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली आहे. या लोकसभा मतदारसंघात आपण इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देणार असू तर खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आपण प्रयत्न करायला हवा असं म्हणणं देखील स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडलं.


शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा


दरम्यान, मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानं दावा केला आहे. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कशाप्रकारे सीट निवडून येतील याबतात माहिती या बैठकीत घेतली, तसेच विधानसभेच्या मतदारसंघाचा देखील आढावा घेतला. सध्याची परिस्थिती आणि पाठीमागची परिस्थिती काय होती आणि कशाप्रकारे निवडणूक लढवून आपल्याला जागा जिंकता येईल याबद्दलची माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. दरम्यान, शिरुर मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळं या जागेवर शिवसेनेनेच उमेदवारी लढवली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. सध्या आढळराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Shirdi Election: शिर्डीसाठी ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव फायनल? सुजय विखेंचा पराभव करण्याचाही निर्धार