नवी मुंबई : तब्बल 50 हजार माथाडी कामगारांच्या आयुष्याची पुंजी असलेल्या ठेवींवर राष्ट्रीयकृत बँकेने डल्ला मारल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. माथाडी कामगार काम करत असलेल्या पाच बोर्डाद्वारे ठेवण्यात आलेल्या 100 कोटींच्या ठेवी बनावट कागदपत्रांचा वापर करुन परस्पर इतर बँक खात्यांमध्ये वळवून घेण्याचा प्रकार बँकेतील अधिकाऱ्यांनी केला आहे.

या घोटाळ्यात शासनाच्या कामगार मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय माथाडी कामगार संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी माथाडी कामगार संघटनेने केली आहे.

शासकीय, निमशासकीय संस्थांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अनेक राष्ट्रीयकृत बँकेत ठेवल्या जातात. या ठेवींबाबत संबंधीत संस्थांशी पत्रव्यवहार केल्याशिवाय त्या इतरत्र वापरण्याचे अधिकार बँकांना नसताना माथाडी कामगार बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा बँकांनी अपहार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

50 हजार माथाडी कामगारांच्या ग्रॅच्युईटी, पी. एफ. चे पैसे शासनाच्या कामगार बोर्डाकडे जमा केले जातात. याच 100 कोटी रुपयांच्या माथाडी कामगारांच्या ठेवी परस्पर बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने इतर खात्यांमध्ये वळती करुन त्या हडप करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात शासनाच्या कामगार खात्यातील अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शासन दरबारी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्यकारी आध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.