मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. गृह विभागानं यासंदर्भातल्या सूचना जारी केल्यात .त्यामुळे या वर्षी गरबा आणि दांडिया खेळता येणार नाही. इतर सणांप्रमाणे नवरात्रोत्सवही कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करावा लागणार आहे.

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली

  1. नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित

  2. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका/स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवनगी घेणे आवश्यक

  3. नवरात्रोत्सवासाठी मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

  4. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट , घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादित ठेवावी

  5. गरबा, दांडिया इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करावेत

  6. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

  7. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

  8. रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा.

  9. रावण दहनाकरिता किमान व्यक्तीचं कार्यक्रमस्थळी हजर राहतील याची काळजी घ्यावी

  10. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

  11. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

  12. मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.


कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.