नागपूर : चीनच्या आक्रमणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. कारण सणासुदीला बाजारात चायनीज मालामुळे नैसर्गिक फुलांना बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे दिवाळीसह इतर सणांवेळी आर्टिफीशयल फुलांवर बंदी घालण्यात यावी, अशी विनंती नागपूरचे शेतकरी आणि फुल विक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
चायनाची कृत्रिम फुलं बाजारात आल्यानं नैसर्गिक फुलांचे भाव गडगडले आहेत. आधी 40 रूपयांना विकली जाणारी फुलं आता केवळ 20 रूपयांत विकली जात आहेत. याचप्रमाणे इतर फुलांचे भावही असेच खाली आले आहेत.
नागपूरच्या महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये विविध सुंदर फुले बघायला मिळतात. मात्र चायनाच्या कृत्रिम फुलांमुळे फुल उत्पादकांचं अक्षरश: कबंरडं मोडलं आहे. जी फुलं आज 20 रुपयांना विकत आहेत, ती फुलं 4 ते 5 वर्षांपूर्वी चक्क 40 रुपयांना विकली जात होती. गुलाबाची 20 फुलं उत्पादक 50 रुपयाला विकत आहे, जे तो चार वर्षांपूर्वी 120 रुपयांना विकत होता. झेंडूच्या फुलांचीही तीच अवस्था आहे. झेडूंच्या फुलांच्या किमतीतही निम्मी झाली आहे.
राज्यात प्लास्टिक बंदी असताना चायनाची फुलांची विक्री कशी सुरू आहे, हा देखील प्रश्नच आहे. मात्र नैसर्गिक फुलांचं सौंदर्य टिकवायचे असेल, तर अशा चायनाच्या प्लास्टिक फुलांवर बंदीचा निर्णय घेणे गरजेचे आहे.