Maharashtra: राज्यात डॉल्बी (Dolby), लेझर प्रकाशझोत (Laser Lights) आणि एलईडीमुळे (LED) नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याची अनेक प्रकरणं यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान समोर आली. याची दखल घेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पत्र लिहीलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) लेझर लाईट, डॉल्बीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी वडेट्टीवारांनी पत्राद्वारे केली.


नक्की काय म्हणाले वडेट्टीवार?


लेझर लाईट, एलईडी लाईट, डॉल्बीचे स्पष्ट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागले असल्याचं वड्डेटीवार म्हणाले. डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. तर लेझरमुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास, डोळ्यांचे आजार होत आहेत. त्यामुळे आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या डॉल्बी, लेझर लाईट आणि एलईडी लाईटच्या वापरावर सार्वजनिक ठिकाणी कठोर निर्बंध आणावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्याना पत्राद्वारे केली आहे.


डॉल्बीच्या आवाजामुळे अनेकांचे मृत्यू


पुण्यातील हिंजवडीत योगेश अभिमन्यू साखरे या तरुणाचा डॉल्बीच्या तीव्र आवाजाने मृत्यू झाला. सांगलीतील तासगाव येथे राहणारा शेखर सुखदेव पावशे या तरुणाचा डॉल्बीच्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. तर सांगलीच्याच वाळवा तालुक्यातील दुधारी येथे 35 वर्षीय प्रवीण शिरतोडे या तरुणाचाही असाच डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला होता.


'लेझर लाईटवर निर्बंध आणण्याची गरज'


अनेक मिरवणुकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट आकाशाच्या दिशेने आणि जमलेल्या लोकांच्या अंगावरून फिरवली जाते. लेझर लाईट आणि एलईडी लाईटमुळे कायमचं अंधत्व (Blind) येण्याचा धोका असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉल्बी, लेझर लाईट आणि एलईडी लाईटचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्याबाबत कठोर निर्बंध आणण्याची गरज आहे, याबाबतचे कठोर नियम  करण्याची आवश्यकता आहे, असं वडेट्टीवारांनी पत्रात म्हटलं. सरकारने पुढाकार घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


हिंजवडी येथील एका 23 वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. योगेश अभिमन्यू साखरे असं मृताचं नाव असून तो हिंजवडी येथील रहिवासी होता. सागरला हृदयविकाराचा त्रास होता आणि डॉक्टरांनी त्याला उपचाराचा सल्ला दिला होता, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास तो हिंजवडीजवळ मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये धाव घेतली तिथेच तो कोसळला.


हेही वाचा:


महायुतीसोबत का गेलो? सत्तेतील 100 दिवसपूर्तीनंतर अजित पवारांचे भले मोठे पत्र!